साहिबजादे मुघलांच्या समोर झुकले नाहीत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

दहावे शीख गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांचे साहिबजादे (पुत्रांनी) यांनी दिलेले बलिदान सर्वांनी आठवणीत ठेवायला हवे. साहेबजादे कधीही मुघलांसमोर झुकले नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
साहिबजादे मुघलांच्या समोर झुकले नाहीत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Photo : X (Narendra Modi)
Published on

नवी दिल्ली : दहावे शीख गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांचे साहिबजादे (पुत्रांनी) यांनी दिलेले बलिदान सर्वांनी आठवणीत ठेवायला हवे. साहेबजादे कधीही मुघलांसमोर झुकले नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भारत मंडपम येथे ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोदींनी वीर बाल पुरस्कार विजेत्या मुलांसोबत गप्पा मारल्या.

ते म्हणाले की, देश आज त्या शूर पुत्रांचे स्मरण करीत आहे, जे भारताच्या अदम्य धैर्य, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिनिधित्व करतात. त्या शूर साहिबजाद्यांनी वय आणि परिस्थितीच्या मर्यादा ओलांडल्या. त्यांनी क्रूर मुघल सत्तेविरोधात उभे राहून धार्मिक कट्टरता आणि दहशतीच्या अस्तित्वालाच हादरा दिला. ज्यांचा भूतकाळ एवढा गौरवशाली आहे आणि ज्यांच्या तरुण पिढीला अशी प्रेरणा लाभली आहे, असे राष्ट्र काय साध्य करू शकणार नाही? असे पंतप्रधान म्हणाले.

औरंगजेबला माहीत होते की, भारतातील जनतेमध्ये भीती पसरवायची आणि जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणायचे असेल, तर सर्वप्रथम भारतीयांचे मनोबल तोडावे लागेल. म्हणूनच त्याने साहिबजाद्यांना लक्ष्य केले. पण औरंगजेब आणि त्याचे सेनापती हे विसरले की, आपले गुरू सामान्य मानव नव्हते. ते तपस्या आणि त्यागाचे सजीव प्रतीक होते, विचारात आणि कृतीत दैवी अवतार होते,’ असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याचा निर्णय देशाने घेतला आहे. भारतीयांच्या त्यागाच्या व पराक्रमाच्या स्मृती दडपल्या जाणार नाहीत. आता देशातील नायक-नायिकांना दूरवर ढकलले जाणार नाही. म्हणूनच आपण ‘वीर बाल दिवस’ संपूर्ण उत्साहाने साजरा करीत आहोत. गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होत असलेल्या आपल्या देशात भाषिक विविधता ही आपली ताकद बनत आहे,’ असे ते म्हणाले.

वैभव सूर्यवंशीसह २० मुलांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २० मुलांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित केले. या मुलांना १८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडण्यात आले. क्रिकेटर वैभव सूर्यवंशी, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात सीमेवर जवानांना चहा-नाश्ता देणारा श्रवण सिंग यांचा गौरव करण्यात आला. तामिळनाडूची व्योमा व बिहारच्या कमलेश कुमार यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला.

logo
marathi.freepressjournal.in