काँग्रेसवर कुणाचा दबाव होता? २६/११च्या मुंबई हल्ल्यावरून पंतप्रधानांचा काँग्रेसवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तीव्र टीका करत विचारले की, २००८ मधील २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? त्या वेळी देशाचे लष्कर पाकिस्तानवर हल्ल्यास सज्ज होते, मात्र परकीय दबावामुळे काँग्रेस सरकारने तो हल्ला रोखला, असा आरोप करत मोदी यांनी काँग्रेसकडून याचे उत्तर मागितले.
काँग्रेसवर कुणाचा दबाव होता? २६/११च्या मुंबई हल्ल्यावरून पंतप्रधानांचा काँग्रेसवर निशाणा
Published on

नवी मुंबई : मुंबईवर २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले? मुंबईवर झालेल्या हल्ल्यावेळी संपूर्ण देश या हल्ल्याच्या वेदना सहन करत होता, तेव्हा काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले होते. जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता, तेव्हा आपले लष्कर पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी सज्ज होते, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने नुकतेच म्हटले होते. संपूर्ण देशाचीही तीच इच्छा होती. मात्र, कुठल्यातरी अन्य देशाच्या दबावाखाली येऊन काँग्रेस सरकारने देशाच्या सैन्यदलांना पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले. कोणत्या परकीय शक्तीच्या सांगण्यावरून हल्ला रोखला गेला याचे उत्तर काँग्रेसने दिले पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी मुंबई मेट्रो मार्गिका-३ तसेच ‘मुंबई वन’ ॲॅप आणि विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईसह राज्यात होणाऱ्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “काँग्रेसच्या या कमजोरीमुळे दहशतवाद्यांचे बळ वाढले. ज्याची किंमत देशाला अनेकदा मोजावी लागली, आपले जवान शहीद झाले. देशाच्या सुरक्षेला कमजोर केले. आमच्यासाठी देश आणि देशाची सुरक्षा याव्यतिरिक्त काहीच मोठे नाही. आजचा भारत दमदार प्रत्युत्तर देतो. आजचा भारत घरात घुसून मारतो. हे जगाने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाहिले आहे. याचा सर्वांना गर्व आहे.”

“मुंबईची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले असून ते आशियातील सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी ठरेल. मुंबईला भूमिगत मेट्रो मिळाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास सोपा होईल. विकसित भारताचे हे जिवंत प्रतीक आहे. मुंबईसारख्या वर्दळीच्या शहरात आणि ऐतिहासिक इमारतींच्या शहरात ही शानदार मेट्रो जमिनीखालून तयार केली आहे. त्यासाठी मी काम करणारे कामगार आणि अभियंत्यांचे अभिनंदन करतो. गेल्या अकरा वर्षापासून देशवासीयांचे जीवन सुविधाजनक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच रेल्वे, रस्ते मार्ग, विमानतळ, मेट्रो, इलेक्ट्रिक बस अशा प्रत्येक सुविधांवर अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. अटल सेतू आणि कोस्टल रोडसारखे प्रकल्प तयार झाले आहेत. वाहतुकीच्या प्रत्येक मार्गाला आपांपसात जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही मोदी यांनी सांगितले.

याप्रसंगी मला महाराष्ट्राचे सुपुत्र दि. बा. पाटील यांचीदेखील आठवण येत आहे. त्यांनी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी सेवाभावाने काम केले. ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे जीवन हे आपल्या समाजाला कायमच प्रेरणादायी राहील. आज पूर्ण देश विकसित भारताच्या संकल्पाला जोडला गेलेला आहे. विकसित भारतात गती असेल आणि प्रगतीदेखील असेल. ज्या ठिकाणी लोकांचे हित हे सर्वात वरती असेल. सरकारची योजना देशवाशीयांचे आयुष्य सुलभ बनवण्यासाठी असेल. मागील ११ वर्षाच्या यात्रेमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात याच भावनेने तेज गतीने विकास झाला आणि काम झाले आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

मविआचे काम कोणत्याही पापापेक्षा कमी नाही!

याच मेट्रोलाईचे भूमिपूजनदेखील मी केले होते. त्यामुळे मुंबईकरांना त्यांचे जीवन सुखकर होईल, अशी आशा वाटत होती. मात्र, मधल्या काळात ज्या लोकांची सत्ता आली. त्यांनी याचे कामच थांबवले. त्यांना सत्ता मिळाली मात्र देशाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. प्रत्येक मिनिटांचे महत्त्व असलेल्या मुंबईला दोन-तीन वर्षांपासून या सुविधांपासून वंचित राहावे लागले. हे काम कोणत्याही पापापेक्षा कमी नाही, अशा शब्दांतही मोदींनी मविआवर टीकास्त्र सोडले.

नवी मुंबईत तिसरी, तर वाढवणला चौथी मुंबई - देवेंद्र फडणवीस

हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आले आणि या विमानतळाच्या कामाला वेग आाला. मोदींनी सूत्रे हाती घेतल्यानंतर कामाला वेग दिला. या विमानतळासंदर्भात आठ एनओसी प्रलंबित होत्या. त्यानंतर मोदींनी बैठक घेतल्यावर काही तासांत सात एनओसी मिळाल्या. त्यावर त्यांनी आठव्या एनओसीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. प्रशासनाने त्यावर काम केले आणि १५ दिवसांत आठवी एनओसी मिळवली. आपले पुढचे लक्ष्य आता वाढवण बंदर असेल. हे बंदर मोदी यांनी आपल्याला भेट म्हणून दिले आहे. तिथेच देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ उभारणार आहोत. आपल्या नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई होणार आहे आणि वाढवणजवळ चौथी मुंबई होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मोदींचा हात लागतो, त्या गोष्टीचे सोने होते -एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात, तेव्हा मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आपण करतो. आठ वर्षांपूर्वी मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले होते, त्याचे आज लोकार्पण होत आहे. मोदींचा हात लागतो त्या गोष्टीचे सोने होते. २०१४ मध्ये मोदींनी टेकऑफ केले, ते भारताला महासत्ता करण्यासाठीच. प्रगती आणि विकास बरोबर येतात. उड्डाण म्हटले की आम्हाला मोदी आठवतात. उत्तर आणि पश्चिम मुंबईला भुयारी मार्गाने दक्षिण मुंबईशी जोडणारी मेट्रो ही याचे उत्तम उदाहरण आहे.

दोन ते चार वर्षांत सगळ्या मेट्रो सुरू होतील. हे काम केवळ आणि केवळ महायुतीच करू शकते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत मोदींवर स्तुतीसुमने उधळली.

logo
marathi.freepressjournal.in