"आता दहशतवाद्यांना मातीत गाडायची वेळ...कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देणार"; पंतप्रधान मोदींचा थेट इशारा

आज संपूर्ण जगाला सांगतो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढणार आणि धडा शिकवणार. मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो की ज्यांनी हा हल्ला केलाय त्या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट आखणाऱ्यांना, त्यांनी कल्पनाही केली नसेल इतकी मोठी शिक्षा मिळेल.
"आता दहशतवाद्यांना मातीत गाडायची वेळ...कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देणार"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा
"आता दहशतवाद्यांना मातीत गाडायची वेळ...कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देणार"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशाराछाया सौजन्य - एएनआय
Published on

"मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो की ज्यांनी हा हल्ला केलाय त्या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट आखणाऱ्यांना, त्यांनी कल्पनाही केली नसेल इतकी मोठी शिक्षा मिळेल", असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२४) बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर गावात ‘पंचायती राज दिवस’ निमित्त आयोजित जनसभेत सहभागी झाले होते.

भाषणाच्या आधी मोदी यांनी मौन बाळगून पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात दहशतवाद्यांवर निशाणा साधला. "आता उरल्यासुरल्या दहशतवाद्यांनाही मातीत गाडायची वेळ आली आहे", असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले पंतप्रधान?

"२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निरागस देशवासियांना ज्या क्रूरपण मारले त्यामुळे सर्व देश दुःखी आहे. कोट्यवधी देशवासी शोकाकूल आहेत. संपूर्ण देश या हल्ल्यांतील पीडितांसोबत उभा आहे. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, ते बरे व्हावेत यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे", असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचं धाडस

"या दहशतवादी हल्ल्यात कोणी मुलगा, कोणी भाऊ तर कोणी जीवनसाथी गमावलाय. त्यांच्यापैकी कोणी बंगाली बोलायचं, कोणी कानडी बोलायचं, कोणी मराठी होतं, कोणी गुजराती होतं तर कोणी बिहारी होतं. आज या सर्वांच्या मृत्यूमुळे कारगील ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दुःख, आक्रोश एकसारखाच आहे. हा केवळ निरागस पर्यटकांवर नव्हे तर देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचं धाडस केलंय."

मातीत गाडायची वेळ आली

"मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो की ज्यांनी हा हल्ला केलाय त्या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट आखणाऱ्यांना, त्यांनी कल्पनाही केली नसेल इतकी मोठी शिक्षा मिळेल. त्यांना शिक्षा होणारच...आता उरल्यासुरल्या दहशतवाद्यांनाही मातीत गाडायची वेळ आली आहे", असा सज्जड इशारा त्यांनी दिला. "१४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचं कंबरंडं मोडून टाकणार. बिहारच्या मातीतून आज संपूर्ण जगाला सांगतो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढणार आणि धडा शिकवणार. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी प्रत्येक प्रयत्न केला जाईल. मानवतेवर विश्वास ठेवणारे सर्व आमच्यासोबत आहेत. त्यासाठी मी विविध देशांचे आणि त्यांच्या प्रमुखांचे आभार मानतो".

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करण्यासाठी पाच मोठे निर्णय घेण्यात आलेत. यात सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा तसेच अटारी बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सार्कअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणारा व्हिसा बंद करण्याचा, पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in