पाकिस्तानला तीनदा घरात घुसून मारले; ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही - पंतप्रधान

यापुढे भारतावर हल्ला झाल्यास त्याची जबरदस्त मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल, आम्ही तुम्हाला तीन वेळा घरात घुसून मारले आहे याची जाणीव ठेवा, असा इशारा देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असे गुरुवारी येथे स्पष्ट केले.
पाकिस्तानला तीनदा घरात घुसून मारले; ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही - पंतप्रधान
Published on

अलीपूरद्वार : यापुढे भारतावर हल्ला झाल्यास त्याची जबरदस्त मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल, आम्ही तुम्हाला तीन वेळा घरात घुसून मारले आहे याची जाणीव ठेवा, असा इशारा देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असे गुरुवारी येथे स्पष्ट केले.

पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी जाहीर सभेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर कृत्यानंतर देशभरात खूप संताप होता. आमच्या माता-बहिणींचे सिंदूर पुसण्याचे धाडस केले. पण, आपल्या सैन्याने त्यांना सिंदूरची ताकद दाखवून दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जगाला सांगितले की, जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर शत्रूला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

तीनदा घुसून मारले

पाकिस्तानने हे समजून घ्यावे की, आम्ही तीन वेळा त्यांना घरात घुसून मारले आहे. आम्ही शक्तीची पूजा करतो. आम्ही दहशतवादाचे अड्डे नष्ट केले, ज्याची पाकिस्तानने कल्पनाही केली नव्हती. पाकिस्तानकडे दहशतवादाशिवाय काहीही नाही. पाकिस्तानने फक्त दहशतवादाला पोसले आहे. जेव्हा थेट युद्ध होते, तेव्हा पाकिस्तानचा पराभव निश्चित असतो. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांची मदत घेते, असे मोदी म्हणाले.

राज्य सरकारवर टीका

दरम्यान, मोदी यांनी येथील एका जाहीर सभेत पश्चिम बंगालवर सडकून टीका केली. राज्य सरकार हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अधर्माला खतपाणी घालत आहे. त्यामुळे अशा निर्दयी सरकारपासून सुटका व्हावी अशी राज्यातील जनतेची तळमळ आहे. मोदी यांनी अलीकडेच मुर्शिदाबाद आणि मालदा येथे झालेल्या जातीय दंगलींचा उल्लेख केला. सर्वसामान्य जनतेला निर्दयपणाची कशी वागणूक मिळते त्याचे स्मरण होते. आजमितीला पश्चिम बंगाल अनेक संकटांचा समाना करीत आहे. जनतेला अधर्माचे सरकार नको आहे, त्यांना बदल हवा आहे, असे ते म्हणाले.

प्रकल्पांची पायाभरणी

आज जेव्हा भारत 'विकसित राष्ट्र'कडे वाटचाल करत आहे, तेव्हा बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक आहे. या उद्देशाने, केंद्र सरकार येथे पायाभूत सुविधा, नवोपक्रम आणि गुंतवणुकीला सतत नवीन चालना देत आहे. बंगालचा विकास हा भारताच्या भविष्याचा पाया आहे. आज त्या पायावर आणखी एक मजबूत वीट जोडण्याचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in