

नवी दिल्ली : ‘भारत माता की जय’ या घोषणेची ताकद नुकतीच जगाने पाहिली. ही केवळ घोषणाच नाही, तर देशातील प्रत्येक जवान भारतमातेच्या सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी जीवाची बाजी लावतो, त्या प्रत्येक सैनिकाची ही शपथ आहे. देशातील प्रत्येक नागरिकांचा हा आवाज आहे, ‘भारत माता की जय’ हा आवाज मैदानातही घुमतो आणि ‘मिशन’मध्येही घुमतो, असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही पाकिस्तानसाठी ‘लक्ष्मणरेषा’ असल्याचे मंगळवारी ठणकावून सांगितले.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदमपूर हवाई तळावर जाऊन भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांचे कौतुक केले. तसेच ‘भारत माता की जय’ या घोषणेची ताकद जगाने पाहिली, जेव्हा आपल्या बहिणींचे कुंकू पुसले गेले तेव्हा दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना मारले, असे म्हणत भारत बुद्धांची आणि गुरु गोविंद सिंह यांची ही धरती आहे, असे मोदी म्हणाले.
घरात घुसून मारू!
ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते त्यांना भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीयांनी पराभूत केले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हेही दाखवून दिले की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे दहशतवादी आरामात श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून मारू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारताचे सैनिक जेव्हा ‘भारतमाता की जय’ बोलतात, तेव्हा दुश्मनांचा थरकाप उडतो. जेव्हा आपले क्षेपणास्त्र निशाण्यावर पोहोचते तेव्हा दुश्मनांनाही ‘भारतमाता की जय’ ही घोषणा ऐकायला जाते. जेव्हा आमची सेना अणुबॉम्बच्या धमकीची हवा काढतात, तेव्हा आकाशापासून ते पाताळापर्यंत एकच आवाज घुमतो तो म्हणजे ‘भारत माता की जय’. आज भारतीय जवानांनी सर्व भारतीयांची मान उंचावली आहे, असे मोदी म्हणाले.
तिन्ही दलांना सलाम
सकाळीच मी आपल्याला भेटायला आणि दर्शनासाठी आलो आहे. जेव्हा वीरांच्या दर्शनाचा योग येतो, तेव्हा जीवन धन्य होते, आज मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे. येणाऱ्या पिढीसाठी आपले जवान प्रेरणा आहेत. मी देशातील जवानांना सलाम करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे साधे अभियान नाही, तर निर्णायक क्षमतांची त्रिवेणी आहे. भारत बुद्धांची धरती आहे आणि गुरु गोविंद सिंह यांचीही धरती आहे. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा आहे. जेव्हा आपल्या बहिणी आणि मुलींचे कुंकू पुसले गेले तेव्हा आपण दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांचे पंख छाटले. भारतीय जवानांचे शौर्य इतिहासात कायमस्वरूपी कोरले जाईल, आपले लष्कर, हवाईदल आणि नौदल यांना मी सलाम करतो, असेही मोदी म्हणाले.
'त्या' दाव्याची पोलखोल
मोदी अशा वेळी आदमपूर एअरबेसवर पोहोचले, जेव्हा पाकिस्तान जगभरात सतत खोटी माहिती पसरवत आहे. पाकिस्तान सातत्याने आदमपूर एअरबेसवर हल्ला करून त्याचे मोठे नुकसान केल्याचा दावा करत होता. पण, पंतप्रधान मोदी स्वतः आदमपूर एअरबेसवर पोहोचल्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड झाला.
‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणाली सुरक्षित
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले, त्याला भारतीय सैन्याने परतून लावले. पण, यानंतर पाकिस्तान सरकार सतत याबाबत खोटा प्रचार करत होता. आदमपूर एअरबेस उडवल्याचे पाकिस्तान सरकार आणि माध्यमांमधून सांगितले जाऊ लागले. पाकिस्तानने आदमपूरमधील ‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावाही केला होता. पण, आता मोदींनी या एअरबेसवर जाऊन ‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणालीसोबत फोटो शेअर केला. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर या दौऱ्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आदमपूर एअरबेस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आणि पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, या फोटोपैकी एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदींच्या पाठीमागे ‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणालीदेखील दिसत आहे. यावरुनच हा एअरबेस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध होते.