पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम! देशातील ८,९३१ दिवसांच्या कार्यकाळासह सर्वाधिक काळ सरकारप्रमुख

सर्वात जास्त काळ सत्तेत राहिलेले सरकारप्रमुख होण्याचा मान मिळवणारे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा ८९३० दिवसांचा विक्रम मोदी यांनी मागे टाकला. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे तीन वेळा पंतप्रधान ठरलेल्या नरेंद्र मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम! देशातील ८,९३१ दिवसांच्या कार्यकाळासह सर्वाधिक काळ सरकारप्रमुख
पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम! देशातील ८,९३१ दिवसांच्या कार्यकाळासह सर्वाधिक काळ सरकारप्रमुख IANS
Published on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील राजकारणात सर्वाधिक काळ सरकारप्रमुख म्हणून काम करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात जास्त काळ सत्तेत राहिलेले सरकारप्रमुख होण्याचा मान मिळवणारे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा ८९३० दिवसांचा विक्रम मोदी यांनी मागे टाकला. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे तीन वेळा पंतप्रधान ठरलेल्या नरेंद्र मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशा विविध जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या एकूण कार्यकाळ एकत्र केला तर त्यांनी एकूण ८,९३१ दिवस पूर्ण केले आहेत. मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. २१ मे २०१४ पर्यंत ते या पदावर राहिले, म्हणजेच १३ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांनी तीन लोकसभा निवडणुकांद्वारे देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. मोदी हे गुजरातमधील सर्वाधिक काळ सेवा देणारे मुख्यमंत्री आहेत आणि अशा पंतप्रधानांपैकी एक आहेत ज्यांना एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पूर्वानुभव आहे.

दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

गुजरातमध्ये जन्मलेले मोदी हे केंद्रात दोन वेळा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मागे टाकत सलग कार्यकाळात भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी ४,०७८ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ या कालावधीत सलग ४,०७७ दिवस पंतप्रधान म्हणून कार्य केले होते. सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे.

गृहमंत्री अमित शहांनी दिल्या मोदींना शुभेच्छा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ‘सेवा, मेहनत आणि समर्पण यांचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे म्हणत नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वाधिक काळ सेवा करणारे सरकारप्रमुख बनले आहेत. त्यांनी एकूण ८,९३१ दिवस पूर्ण करत पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मागे टाकला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास देशहित, पारदर्शकता आणि सतत जनसेवा याप्रती त्यांच्या बांधीलकीचे दर्शन घडवतो. ज्याला एक दुर्मिळ आणि विश्वासावर आधारित वारसा म्हणून पाहिले जाते,’ असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in