काँग्रेसच्या ‘इकोसिस्टम’ला त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल..." पंतप्रधान मोदींचा इशारा

काँग्रेस खोट बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला, तसेच काँग्रेसनं देशाची प्रगती रोखली, असंही पंतप्रधान म्हणाले.
काँग्रेसच्या ‘इकोसिस्टम’ला त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल..." पंतप्रधान मोदींचा इशारा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत भाषण केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला ते उत्तर देत होते. भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस खोट बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला, तसेच काँग्रेसनं देशाची प्रगती रोखली, असंही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत जसजसा प्रगती करत आहे, तसतशी स्पर्धाही वाढत आहे आणि आव्हानेही वाढत आहेत. हे स्वाभाविक आहे. ज्यांना भारताच्या प्रगतीची अडचण आहे, जे भारताच्या प्रगतीकडे आव्हान म्हणून पाहतात, ते चुकीचे डावपेच आखत आहेत. या शक्ती भारतातील लोकशाही आणि विविधतेवर हल्ला करत आहेत. ही फक्त माझी चिंता नाही, ही फक्त सरकारची चिंता नाही, देशातील जनता आणि माननीय सर्वोच्च न्यायालयासह सर्वांनाच या गोष्टींची चिंता आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटले आहे ते मला सभागृहासमोर सांगायचे आहे."

देशवासीयांनी अशा शक्तींपासून सावध राहण्याची गरज-

पंतप्रधान पुढे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात अतिशय गंभीरपणे म्हटले आहे. असं दिसतंय की महान देशाच्या प्रगतीवर शंका घेण्याचा, ती कमी करण्याचा आणि कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुप्रीम कोर्ट पुढे म्हणालं की, असे कोणतेही प्रयत्न सुरुवातीलाच थांबवले पाहिजेत. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा हे म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलेल्या भावनांचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. भारतातही काही लोक अशा शक्तींना मदत करत आहेत, देशवासीयांनी अशा शक्तींपासून सावध राहण्याची गरज आहे."

'इकोसिस्टमला त्याच भाषेत उत्तरे मिळतील'

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, " २०१४ मध्ये सरकारमध्ये आल्यानंतर केवळ काँग्रेसच नव्हे तर काँग्रेसच्या इकोसिस्टमसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसच्या मदतीने ही इकोसिस्टम ७० वर्षांपासून वाढली आहे. आज मी या इकोसिस्टमला सावध करतो, मला या इकोसिस्टमला इशारा द्यायचाय की, या इकोसिस्टमच्या कृती पाहता, त्यांनी या देशाच्या विकासाचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, या इकोसिस्टमला मी सावध करू इच्छितो. या इकोसिस्टमला त्यांच्या सर्व कटांचे उत्तर आता त्याच्याच भाषेत मिळेल. हा देश देशविरोधी कारस्थान कधीच मान्य करणार नाही."

ते म्हणाले की, "हा असा काळ आहे जेव्हा जग भारताच्या प्रगतीला गांभीर्याने घेत आहे. आता निवडणुका झाल्या आहेत. १४० कोटी देशवासीयांनी पाच वर्षांसाठी आपला निर्णय आणि जनादेश दिला आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी हा निर्णय यशस्वी होण्यासाठी या सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांचे योगदान असणे आवश्यक आहे. मी या सर्वांना विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जबाबदारीने पुढे येण्याचे आमंत्रण देतो. राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर एकत्र येऊ, एकत्र वाटचाल करू आणि देशवासीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करूया."

सुशासनासाठी स्पर्धा करूया-

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजच्या काळात सकारात्मक राजकारण खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, "इंडी आघाडीच्या बाजूने असलेल्या लोकांना मी सांगू इच्छितो की, आपण मैदानात सुशासनासाठी स्पर्धा करूया, लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्पर्धा करूया. देशाचे भलेही होईल आणि तुमच्यासाठीही ते चांगलंय. चांगल्या कामासाठी तुम्ही एनडीएशी स्पर्धा करा, तुमची सरकारे कोठेही असली तरी त्यांनी परकीय गुंतवणुकीला आकर्षित केले पाहिजे, अधिकाधिक परदेशी गुंतवणूक आपापल्या राज्यात यावी यासाठी भाजप सरकारांशी स्पर्धा करावी."

logo
marathi.freepressjournal.in