
काही दिवसांमध्ये कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशामध्ये आज मंड्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यांनी बंगळुरू- म्हैसूर हायवेअंतर्गत १२,६०८ कोटींचे ६ पदरी राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन केले. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "काँग्रेस मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पाहण्यात मग्न आहे, आणि मी एक्सप्रेस वे बांधण्यात मग्न आहे," असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी काय करत आहेत? काँग्रेस माझी कबर खोदण्याचे स्वप्न बघत आहेत, तर मी रस्ते बनवण्यात आणि देशातील गरीब लोकांसाठी काम करण्यात व्यस्त आहे. सागरमाला, भारतमाला यांसारख्या प्रकल्पांमुळे कर्नाटकच नव्हे तर देशही आज बदलत आहे. जग कोरोनाशी झुंज देत असताना देशाने पायाभूत सुविधांचे बजेट अनेक पटीने वाढवून मोठा संदेश दिला. २०१४ आधी काँग्रेस सरकारने गरीब कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले. त्यांच्या विकासाचा पैसा लुटला," असा आरोप काँग्रेसवर केला.