
विलासपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी छत्तीसगडमधील विलासपूर येथे ३३,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. या विकास प्रकल्पांमध्ये वीज, तेल आणि वायू, रेल्वे, रस्ते, शिक्षण आणि गृहनिर्माण यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत लाभार्थ्यांना घराच्या चाव्याही सुपूर्द केल्या. पंतप्रधानांनी अभानपूर-रायपूर रेल्वे विभागात मेमू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला आणि राज्यातील भारतीय रेल्वे नेटवर्कच्या संपूर्ण विद्युतीकरणाचे लोकार्पण केले.
पंतप्रधान मोदींनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विशाख-रायपूर पाईपलाईन प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पाची किंमत २,२१० कोटी रुपये असून लांबी ५४० किमी इतकी आहे. तसेच पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग-१३० डी (४७.५ किमी) च्या कोंडागाव-नारायणपूर विभागाचे दुपदरी उन्नत मार्गाचेही उद्घाटन केले.
‘एनटीपीसी’च्या वीज प्रकल्पाची पायाभरणी
पंतप्रधान मोदींनी ९,७९० कोटी रुपये खर्चाच्या ‘एनटीपीसी’च्या सिपत सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट स्टेज-३ ची पायाभरणी केली. त्यांनी पश्चिम क्षेत्र विस्तार योजनेअंतर्गत पॉवरग्रीडचे ५६० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तीन वीज पारेषण प्रकल्पांचे देखील अनावरण केले.