‘डीपफेक’ रोखण्यासाठी AI कंटेंटवर लेबल असावे; पंतप्रधान मोदी यांचे मत

दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयबद्दल भारताचे व्हिजन जगासमोर मांडले.
‘डीपफेक’ रोखण्यासाठी AI कंटेंटवर लेबल असावे; पंतप्रधान मोदी यांचे मत
(Photo-X/@narendramodi)
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयबद्दल भारताचे व्हिजन जगासमोर मांडले. भावी पिढ्यांसाठी योग्य एआय सोडणे ही आपली जबाबदारी आहे. एआयचा वेग आणि प्रमाण अकल्पनीय आहे. एआयच्या क्षेत्रात आपण मोठे स्वप्न पाहिले पाहिजे, परंतु जबाबदारीने. आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी कोणत्या प्रकारचे एआय सोडत आहोत आणि एआयसह आपण सध्या काय करत आहोत, याचा विचार केला पाहिजे. आपण भूतकाळात अणुविनाश पाहिले आहे आणि आपण उपायदेखील पाहिले आहेत, असे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदींसह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्यूएल मॅक्रॉन आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासारख्या प्रमुख जागतिक नेत्यांनीही शिखर परिषदेला संबोधित केले. ११० हून अधिक देश, २० हून अधिक देशांचे प्रमुख, ३० आंतरराष्ट्रीय संघटना आणि ५०० हून अधिक जागतिक एआय नेते या शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. या शिखर परिषदेत सुमारे १०० सीईओ आणि संस्थापक, १५० शैक्षणिक आणि संशोधक, ४०० सीटीओ, उपाध्यक्ष, १०० पेक्षा जास्त सरकारी प्रतिनिधी उपस्थित आहेत.

नरेंद्र मोदी म्हणाले की, “एआय प्लॅटफॉर्म हे ब्लॅक बॉक्सपेक्षा काचेच्या बॉक्ससारखे असले पाहिजे. याचा अर्थ, एआय सुरक्षा नियम इतके स्पष्ट आणि पारदर्शक असले पाहिजेत की कोणीही ते पाहू आणि सत्यापित करू शकेल, ज्यामुळे कंपन्यांना जबाबदार धरता येईल. जर डेटा सुरक्षित आणि विश्वासार्ह नसेल तर एआयचे आउटपुट धोकादायक ठरू शकते. म्हणूनच डेटा सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे आणि जागतिक स्तरावर विश्वासार्ह डेटा फ्रेमवर्क तयार करण्याचे मोदींनी सुचवले.

भारत एआय क्षेत्रात आपली ताकद वेगाने वाढवत आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, देशात सध्या ३८,००० जीपीयू आहेत आणि पुढील सहा महिन्यांत आणखी २४,००० जीपीयू जोडले जातील.

बिल गेटस‌् यांनी भाषण करणे टाळले

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट माजी सहसंस्थापक बिल गेटस‌् हे या ‘एआय समिट’मध्ये सहभागी झाले होते. मात्र, एपस्टीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या कार्यक्रमात भाषण केले नाही.

मोबाईल डेटाप्रमाणे ‘जिओ’ एआय स्वस्तात देणार - मुकेश अंबानी

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सांगितले की, “रिलायन्स जिओने ज्याप्रमाणे देशात मोबाईल डेटा स्वस्त केला आणि लोकांना कमी किंमतीत उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ सामान्य भारतीयांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाईल. ‘भारत बुद्धिमत्ता भाड्याने घेऊ शकत नाही’ आणि जिओ आता देशाला इंटरनेट युगानंतर ‘इंटेलिजन्स युगा’शी जोडेल. कंपनी जामनगरमध्ये टप्प्याटप्प्याने ‘मल्टी-गीगावॅट एआय-रेडी डेटा सेंटर पार्क’ विकसित करत आहे. २०२६ च्या अखेरीस १२० मेगावॅट क्षमतेसह ते सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.”

logo
marathi.freepressjournal.in