मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान; सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींचे निमंत्रण; उद्या नव्या सरकारचा शपथविधी

मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली असता त्यांनी मोदींना सरकार स्थापण्यासाठी औपचारिक निमंत्रणाचे पत्र दिले. या भेटीदरम्यानच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान; सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींचे निमंत्रण; उद्या नव्या सरकारचा शपथविधी

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआच्या खासदारांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड केल्यानंतर मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली असता त्यांनी मोदींना सरकार स्थापण्यासाठी औपचारिक निमंत्रणाचे पत्र दिले. या भेटीदरम्यानच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रपती मुर्मू यांनी मोदींना दही आणि साखर खाऊ घातली. भारतीय संस्कृतीत कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी दही आणि साखर खाणे शुभ मानले जाते. रविवारी, ९ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी होणार आहे.

तत्पूर्वी, रालोआच्या नेत्यांनी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मोदी यांना पाठिंबा असल्याचे पत्र सुपूर्द केले. मुर्मू यांनी आपली नियोजित पंतप्रधान म्हणून नियुक्ती केल्याचे मोदी यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात वार्ताहरांना सांगितले. मुर्मू यांनी आपल्याला नियोजित पंतप्रधान म्हणून काम पाहण्यास सांगितले असून त्यांनी शपथविधीचीही माहिती आपल्याला दिली, असे मोदी म्हणाले. रविवार, ९ जून रोजी सायंकाळी शपथविधी समारंभ घेतल्यास ते योग्य होईल, असे आपण राष्ट्रपतींना सांगितल्याचे मोदी म्हणाले.

मंत्रिमंडळ सदस्यांची यादी राष्ट्रपतींना देणार

राष्ट्रपती भवनातून रविवारच्या शपथविधी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येईल आणि तेव्हा आपण मुर्मू यांना मंत्रिमंडळातील सदस्यांची यादी सादर करू, १८ वी लोकसभा हे नव्या, तडफदार ऊर्जेचे सभागृह असेल, जनतेने एनडीएला आणखी एक संधी दिली आहे, असेही ते म्हणाले.

अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची मोदी यांनी घेतली भेट

केंद्रात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. एनडीए संसदीय पक्ष, भाजप संसदीय पक्ष आणि लोकसभेतील भाजपच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी यांनी अडवाणी यांची भेट घेतली आणि त्यानंतर मुरली मनोहर जोशी यांचीही भेट घेतली.

नेहमीच मोदींसोबत राहणार - नितीशकुमार

मोदी देशाचा मोठ्या प्रमाणावर विकास करतील आणि बिहारकडेही लक्ष देतील, आमचा मोदी यांना पूर्ण पाठिंबा आहे, आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत राहू, असे जेडीयूचे नेते नितीशकुमार म्हणाले. बिहारमधील सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील, आपण सर्वजण एकत्र आलो ही उत्तम गोष्ट आहे, आम्ही सर्व जण तुमच्यासोबत काम करू, तुमच्या नेतृत्वाखाली काम करू, असे नितीशकुमार म्हणाले.

प्रादेशिक आकांक्षा-राष्ट्रहित यांचे संतुलन साधावे - चंद्राबाबू नायडू

प्रादेशिक आकांक्षा आणि राष्ट्रहित यामध्ये संतुलन साधण्याचा संदेश देत तेलुगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री व जेडीयूचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी रालोआचे (एनडीए) नेते म्हणून शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडला. त्याला जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी, शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, एचएएमचे(एस) प्रमुख जितनराम मांझी यांच्यासह अनेक जणांनी अनुमोदन दिले.

समाजाच्या सर्व स्तरांचा समग्र विकास करताना प्रादेशिक आकांक्षा आणि राष्ट्रहित यांच्यात एकाच वेळी संतुलन साधले पाहिजे, असे नायडू म्हणाले. आंध्र प्रदेशात मोदींनी घेतलेल्या १६ सभांमुळे तेलुगु देसम पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत १६ जागा मिळाल्या, असेही ते म्हणाले. आजमितीला देशाला योग्य वेळी योग्य नेता मिळाला आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी, भारतासाठी ही उत्तम संधी आहे, ती तुम्ही आता गमावली तर पुन्हा कधीच मिळणार नाही, असे नायडू म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in