पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन महासंगणकांचे उद्घाटन गुरुवारी व्हीडिओ कॉन्फरसिंगच्या सहाय्याने करण्यात आले. तंत्रज्ञान सुधारणेमुळे गरीबांचे सबलीकरण शक्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
‘नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन’अंतर्गत भारतीय बनावटीच्या तीन ‘परम रुद्र महासंगणका’चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हीडिओ कॉन्फरसिंगने करण्यात आले. ते म्हणाले की, सामान्य माणसाला तंत्रज्ञानाचा फायदा होण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलले आहेत. २०१५ मध्ये आम्ही ‘नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन’ हाती घेतले. आता ‘क्वांटम कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी’ येऊ घातली आहे. त्यामुळे आयटी, उत्पादन, एमएसएमई आणि स्टार्टअप्ला त्याचा फायदा होईल. माझ्या सरकारने विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाला प्राधान्य दिले आहे. ‘मिशन गगनयाना’ची तयारी सुरू झाली असून २०३५ पर्यंत भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक तयार असेल. विज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे हे आमचे ध्येय आहे, असे मोदी म्हणाले.
तीन महासंगणक १३० कोटी रुपयांत बनले आहेत. ते पुणे, दिल्ली व कोलकाता येथे वैज्ञानिक संशोधनासाठी वापरले जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८५० कोटींच्या उच्च कामगिरी करणाऱ्या संगणक यंत्रणेचे उद्घाटन झाले. हवामान व वातावरण क्षेत्रात संशोधनासाठी हा महासंगणक वापरला जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील ही मोठी कामगिरी आहे. परमसंगणकाच्या निर्मितीमुळे भारत हा योग्य दिशेने व वेगाने चालला आहे, हे सिद्ध होते, असे मोदी म्हणाले.