देशाची पहिली अंतराळ मोहिम 'गगनयान'च्या चार अंतराळवीरांची नावे पंतप्रधानांनी केली जाहीर, 'ॲस्ट्रोनॉट विंग्ज'ही केले प्रदान

गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेत सामील होणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली.
देशाची पहिली अंतराळ मोहिम 'गगनयान'च्या चार अंतराळवीरांची नावे पंतप्रधानांनी केली जाहीर, 'ॲस्ट्रोनॉट विंग्ज'ही केले प्रदान

थिरुवनंतपुरम : गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेत सामील होणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि विंग कमांडर शुभांषू शुक्ला अशी या अंतराळवीरांची नावे असून ते भारतीय हवाईदलात कार्यरत आहेत. मोदी यांनी त्यांना अंतराळवीरांचे बोधचिन्ह (ॲस्ट्रोनॉट विंग्ज) प्रदान केले.

केरळच्या किनाऱ्यावर थिरुवनंतपुरमपासून जवळच थुंबा येथे असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) 'विक्रम साराभाई स्पेस सेंटर'मध्ये (व्हीएसएससी) मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली. त्यांना 'विंग्ज' प्रदान केले आणि तीन महत्त्वाच्या सुविधांचे उद्घाटन केले. त्यात श्रीहरिकोटा येथील 'सतीश धवन स्पेस सेंटर'मधील 'पीएलएलव्ही इंटिग्रेशन फॅसिलिटी' (पीआयएफ), इस्रोच्या महेंद्रगिरी येथील 'प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स'मधील 'सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन अँड स्टेज टेस्ट फॅसिलिटी' आणि व्हीएसएससीमधील 'ट्रायसॉनिक विंड टनेल' या सुविधांचा समावेश आहे. या तिन्ही सुविधांच्या उभारण्यासाठी साधारण १८०० कोटी रुपयांचा खर्च आला असून त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्राला मोठी मदत मिळणार आहे. सध्या 'इस्रो' वर्षात ६ 'पीएसएलव्ही' प्रक्षेपित करू शकतो. 'पीआयएफ' सुविधेमुळे वर्षात १५ 'पीएसएलव्ही' प्रक्षेपित करणे शक्य होईल.

अंतराळवीरांना विंग्ज प्रदान करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या केवळ चार व्यक्ती किंवा चार नावे नाहीत. या चार शक्ती आहेत, ज्या १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षांना अंतराळात घेऊन जाणार आहेत. चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय नागरिक अंतराळात जात आहेत. ही वेळही आमची आहे, हे काऊंटडाऊनही आमचे आहे आणि हे रॉकेटही आमचे आहे. प्रत्येक देशाच्या विकासाच्या वाटचालीत असे काही क्षण येतात, जे केवळ वर्तमान घडवत नाहीत तर देशाच्या भावी पिढ्यांचे भविष्यही निश्चित करतात. आज भारतासाठी तसा क्षण आला आहे.

मोदी यांनी गगनयान यंत्रणेतील बहुतांश भाग स्वदेशी बनावटीचे असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच अंतराळवीरांचे कौतुक करून त्यांचे नाव यशाबरोबर जोडले जाईल, असे म्हटले. गेल्या काही महिन्यांत चांद्रयान, मंगळयान आणि आदित्य एल-१ मोहिमा यशस्वी केल्याबद्दल मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या यशातील महिला शास्त्रज्ञांच्या सहभागाचा मोदी यांनी अभिमानपूर्वक उल्लेख केला. पुढील दशकात भारताचा अंतराळ उद्योग पाच पटींनी वाढून ४४ अब्ज डॉलर्सवर पोहोचेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पबीनराई विजयन, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

गौरवशाली गगनवीर

ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि विंग कमांडर शुभांषू शुक्ला हे चार अंतराळवीर गगनयान मानवी मोहिमेसाठी निवडले गेले आहेत. गगनयान मोहीम २०२४-२५ सालात हाती घेतली जाणार असून त्या अंतर्गत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण ४०० किमी अंतरावरील कक्षेत अंतराळवीरांसह यान पाठवले जाणार आहे. हे चौघेही भारतीय हवाईदलातील लढाऊ वैमानिक आहेत. त्यातील प्रत्येकाला विविध प्रकारच्या विमानांचे सारथ्य करण्याचा २००० ते ३००० तासांचा अनुभव आहे. ग्रुप कॅप्टन नायर यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) प्रशिक्षणात स्वोर्ड ऑफ ऑनर मिळवली होती, तर ग्रुप कॅप्टन कृष्णन हे एअरफोर्स अकादमीत स्वोर्ड ऑफ ऑनरचे मानकरी ठरले होते. या चौघांनीही रशियात मॉस्कोजवळील स्टार सिटीमध्ये असलेल्या युरी गागरीन कॉस्मोनॉट ट्रेनिग सेंटरमध्ये अंतराळवीरांचे प्रशिक्षण घेतले आहे. रशियातील याच केंद्रात १९८४ साली भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा आणि त्यांचे सहकारी रवीश मल्होत्रा यांनी प्रशिक्षण घेतले होते.

logo
marathi.freepressjournal.in