...तर सगळ्यांना पश्चाताप होईल! निवडणूक रोख्यांवरून मोदींची टीका

‘ईडी’द्वारे दाखल केलेले गुन्हे हे राजकारणाबाहेरील व्यक्ती व संस्थांच्या विरोधात आहेत. इमानदार व्यक्तींना घाबरण्याची गरज नाही, पण भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांमध्ये ‘पाप’ केल्याची भीती असते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.
...तर सगळ्यांना पश्चाताप होईल! निवडणूक रोख्यांवरून मोदींची टीका
Published on

नवी दिल्ली : निवडणूक रोख्यांमुळे पैशाचा प्रवास, स्रोत कळत होता. कोणत्या कंपनीने पैसे दिले, कोणाला दिले, कुठे दिले याची माहिती मिळत होती. मात्र, निवडणूक रोख्यांवरून विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करत आहेत. जेव्हा विरोधी पक्ष इमानदारीने विचार करतील, तेव्हा प्रत्येकाला पश्चाताप होईल. जे लोक निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक झाल्याबद्दल गोंधळ घालत आहेत त्यांना नंतर पश्चाताप होईल. त्यांनी देशाला काळ्या पैशाच्या दिशेने ढकलले आहे, असे ते म्हणाले.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, २०१४ पूर्वीही देशात निवडणुकीत पैसा खर्च होत होता. तेव्हा कोणी पैसा दिला, कोणी खर्च केला याची माहिती मिळत नव्हती. कोणतीही यंत्रणा परफेक्ट नसते. त्यातील त्रुटी दूर करता येतात. निवडणुकीच्या काळात काळ्या पैशाचा वापर होतो, अशी चर्चा देशात दीर्घकाळापासून सुरू आहे. निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च होतो. देणगीद्वारे पैसा घ्यावा लागतो. निवडणुकीत काळा पैसा लागणार नाही असे काहीतरी करावे, अशी माझी इच्छा होती. आम्ही एक लहानसा रस्ता शोधत होतो. मात्र तो योग्य आहे असा माझा दावा नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

‘ईडी’द्वारे दाखल केलेले गुन्हे हे राजकारणाबाहेरील व्यक्ती व संस्थांच्या विरोधात आहेत. इमानदार व्यक्तींना घाबरण्याची गरज नाही, पण भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांमध्ये ‘पाप’ केल्याची भीती असते, असे मत पंतप्रधान मोदी यांनी मांडले.

ते म्हणाले की, किती विरोधी पक्षनेते तुरुंगात आहेत, याची माहिती मला नाही. सरकार चालवणारे हेच विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना पाप केल्याची भीती आहे. इमानदार व्यक्तीला घाबरण्याचे कारण काय? मी मुख्यमंत्री असताना माझ्या गृहमंत्र्यांना तुरुंगात टाकले होते. ईडीच्या केवळ तीन टक्के प्रकरणात राजकीय नेते सामील असून ९७ टक्के प्रकरणे ही राजकारणाबाहेरील आहेत. २०१४ पूर्वी ईडीने केवळ ५ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. तेव्हा कोणी ईडीला कारवाईपासून रोखले होते. माझ्या कार्यकाळात एक लाख कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली. हा पैसा देशातील जनतेचा नाही का, असा प्रश्न मोदी यांनी केला.

२०४७ पर्यंत भारत तिसरी अर्थव्यवस्था बनेल

२०४७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची बनावी, असे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. येत्या पाच वर्षांत ती ५ ट्रिलियन डॉलरची बनेल, असा दावा त्यांनी केला. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती दाखवली जात आहे. मी कोणाला घाबरवण्यासाठी निर्णय घेत नाही. देशाच्या विकासासाठी निर्णय घेतो, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in