'आयुष्मान भारत 'वरून मोदींचे दिल्ली, ममता सरकारवर टीकास्त्र; राजकीय हेतूने योजनेच्या अंमलबजावणीस नकार

या योजनेची अंमलबजावणी न करण्यामागे या दोन राज्यांचा राजकीय हेतू आहे, या विस्तारित आरोग्य सेवेचा लाभ या दोन राज्यांमधील वृद्धांना मिळत नसल्याने आपल्याला वेदना होत आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'आयुष्मान भारत आरोग्य विमा' योजनेवरून दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. या योजनेची अंमलबजावणी न करण्यामागे या दोन राज्यांचा राजकीय हेतू आहे, या विस्तारित आरोग्य सेवेचा लाभ या दोन राज्यांमधील वृद्धांना मिळत नसल्याने आपल्याला वेदना होत आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.

'आयुष्मान भारत' या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेचा विस्तार मंगळवारी मोदी यांनी केला. त्यामुळे आता देशातील ७० वर्षे अथवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आपण सेवा करू शकत नाही त्याबद्दल आपण त्यांची माफी मागतो. तुमच्या वेदनांची आपल्याला जाणीव आहे, मात्र तरीही आपल्याला तुमची मदत करता येत नाही. दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकार राजकीय हेतू साध्य करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे त्याचा लाभ तुम्हाला मिळू शकत नाही, असे मोदी यांनी म्हटले आहे.

ही योजना कोणत्याही उत्पन्न गटातील ज्येष्ठांसाठी उपलब्ध असेल. देशातील ४.५ कोटी कुटुंबातील ६ कोटींहून अधिक वृद्धांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी केवळ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांचा यात समावेश होता. मात्र, आता वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत कोणतीही उत्पन्न मर्यादा नसेल.

आयुष्मान वय वंदना कार्ड

रुग्णालयांमध्ये ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना विनामूल्य उपचार मिळणार असून त्यांना 'आयुष्मान वय वंदना कार्ड' मिळणार आहे, अन्य राज्यांमधील ज्येष्ठ नागरिकांची आपल्याला सेवा करावयास मिळत आहे, मात्र दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील जनतेची सेवा करावयास मिळत नाही, अशी खंत मोदी यांनी व्यक्त केली.

१२,८५० हून अधिक कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

धन्वन्तरी जयंती आणि नवव्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून मोदी यांनी १२ हजार ८५० कोटींहून अधिकच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, ७० वर्षे वय झालेल्या नागरिकांना आयुष्मान भारत आरोग्य विमान योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन आपण निवडणुकीदरम्यान दिले होते, ते आता पूर्ण झाले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in