जलपैगुडी : तृणमूल कॉंग्रेसला पश्चिम बंगालमध्ये भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचा मुक्त परवाना हवा आहे आणि म्हणूनच अशा प्रकरणांच्या तपासासाठी गेलेल्या मध्यवर्ती यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर तेथे हल्ले केले जात आहेत, असा आरोप रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपैगुडी येथील जाहीरसभेत केला.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सिंडिकेट राज सुरू आहे. भ्रष्ट नेत्यांना संरक्षण देण्यातच तृणमूल काँग्रेसला स्वारस्य आहे. पक्षाच्या खंडणीखोर आणि भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बिहारमधील एका जाहीरसभेत काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसने अलीकडेच घोषित केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा असल्याचा आरोप मोदी यांनी केला. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये राष्ट्रीय ऐक्य आणि सनातन धर्म यांच्याबद्दल शत्रुभाव व्यक्त करणारी असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे. बिहारमधील नवाडा येथे एका जाहीरसभेत मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी राज्यात काँग्रेस-राजदचे सरकार होते तेव्हाच्या स्थितीचा 'जंगलराज' असा उल्लेख केला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे नेते सुशील मोदी यांची स्तुती केली.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा आहे, काँग्रेसने जाहीरनामा घोषित केला नाही तर 'तुष्टीकरण पत्र' जाहीर केले, अशी टीका मोदी यांनी केली. भाजपच्या नेत्यांनी अलीकडेच ‘कलम ३७०’ रद्द करण्यात आल्याबद्दल भाष्य केले होते. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणुकीच्या प्रचारात हा प्रश्न उपस्थित करण्यास हरकत घेतली होती. तोच धागा पकडून मोदी यांनी खर्गे यांच्यावर टीका केली. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे लहान पद नाही, खर्गे यांना ‘कलम ३७०’चा राजस्थानशी संबंध नाही, असे वाटते. जम्मू-काश्मीर हा देशाचा अंतर्गत भाग नाही का, असा सवाल मोदी यांनी केला.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करताना राजस्थान आणि बिहारसह देशभरातील जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव त्यांच्या जन्मगावी पोहोचले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
घटनेची पूर्ण अंमलबजावणी काश्मीरमध्ये का झाली नाही?
इंडिया आघाडीचे लोक घटनेबद्दल नेहमी बोलतात. जम्मू-काश्मीरमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या घटनेची पूर्ण अंमलबजावणी ते का करू शकले नाहीत याचे कारण त्यांच्या नेत्यांनी जनतेला सांगितले पाहिजे, त्यासाठी त्यांना मोदी यांची प्रतीक्षा का करावी लागली, असा सवाल मोदी यांनी केला.