दिमागी नक्षलचा धोका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, जवानांसोबत साजरी केली दिवाळी

‘नक्षलवादाचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. जंगलांमधील सशस्त्र नक्षलवाद्यांचा सफाया झाला तरीही आता ‘दिमागी’ नक्षलवाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.


दिमागी नक्षलचा धोका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, जवानांसोबत साजरी केली दिवाळी
दिमागी नक्षलचा धोका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, जवानांसोबत साजरी केली दिवाळी X
Published on: 

नवी दिल्ली : ‘नक्षलवादाचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. जंगलांमधील सशस्त्र नक्षलवाद्यांचा सफाया झाला तरीही आता ‘दिमागी’ नक्षलवाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. या नक्षलवाद्यांनी अनेक राजकीय संघटनांमध्ये घुसखोरी केली आहे. त्यांची ओळख पटवून त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. हे लोक जनतेला राज्यघटना आणि लोकशाहीविरोधात भडकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

छत्तीसगडमधील बस्तर येथे कोब्रा ऑपरेशन्स तळावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांशी मोदी यांनी संवाद साधला. जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते येथे आले होते. अबुझमाड आणि बस्तर परिसरातील मोहिमांसाठी हे केंद्र पूर्वी प्रमुख तळ म्हणून ओळखले जात होते. यावेळी त्यांनी छत्तीसगडमधील सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या स्मारकाला भेट देऊन वीर जवानांना आदरांजली वाहिली.

तुम्ही शूर जवान माझ्या कुटुंबाचाच भाग...

दिवाळीच्या उत्साहात सुरक्षा दलातील जवानांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पारंपरिक आदिवासी गीतांवर नृत्य केले. ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. एकेकाळी नक्षलवादाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात सुरक्षा जवानांनी पंतप्रधानांसोबत दिवाळीचा आनंद लुटला.

सुरक्षा जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यामागील भावना व्यक्त करताना मोदी म्हणाले की, देशाच्या सीमांचे रक्षण करणारे आणि देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे जवान हे त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. आज संपूर्ण देशात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कोट्यवधी भारतीय प्रकाशाचा हा पवित्र सण साजरा करत आहेत. कुटुंबीय आणि प्रियजनांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक जण दूरवरून आपल्या घरी परतत आहेत. कुटुंबीयांनी एकत्र येऊन सण साजरा करण्याचा हा आनंदाचा प्रसंग आहे. मीदेखील तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. देशाच्या सीमेवर किंवा देशांतर्गत भागात सुरक्षा करणारे, राष्ट्राचे रक्षणकर्ते असलेले आणि भारतमातेचे शूर पुत्र व कन्या असलेले तुम्ही सर्व जण माझ्या कुटुंबाचाच भाग आहात,’ असे मोदी यांनी सांगितले.

विकासाची नवी लाट सुरू झाली

तुम्ही सर्वजण माझ्या कुटुंबातील सदस्य आहात. यंदा मी बस्तरच्या जंगलात दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. हा तोच प्रदेश आहे, जिथे एकेकाळी नक्षलवादाचे मोठे संकट होते. मात्र, तुमच्या त्यागामुळे आणि समर्पणामुळे या भागातून नक्षलवादाचे संकट संपुष्टात आले आहे आणि विकासाची नवी लाट सुरू झाली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

देशात प्रत्येक जिल्हा झालाय नक्षलवादमुक्त

ते म्हणाले की, देशातील नक्षलवादाची भीती संपली आहे. गेल्या ४० ते ५० वर्षांत पहिल्यांदाच देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादमुक्त झाला आहे. वर्षभरात ‘सीआरपीएफ’चा एकही जवान शहीद झालेला नाही. सुरक्षा दलांचे शौर्य, धैर्य आणि सरकारच्या योग्य धोरणांचा हा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. २००४ ते २०१३ या कालावधीत दरवर्षी नक्षलवाद्यांच्या तुलनेत आपले जवान अधिक शहीद होत होते. गेल्या सरकारांनी नक्षलवाद हा कधीही बरा न होणारा आजार असल्याचे मान्य केले होते. एखाद्या देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत असेल, तर बाह्य शत्रूंना यश मिळवता येत नाही. मात्र, अंतर्गत सुरक्षा कमकुवत झाली की बाह्य शत्रूही डोके वर काढू लागतात, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान अस्वस्थ ; काँग्रेसचे टीकास्त्र

नवी दिल्ली : राजकीय विरोधकांना ‘दिमागी नक्षल’ संबोधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने रविवारी जोरदार पलटवार केला. पंतप्रधान अस्वस्थ, विचलित आणि हतबल झाले असून, त्यांची ‘झोला उचलण्याची वेळ’ आता जवळ आली आहे, असा टोला काँग्रेसने लगावला. काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरून पंतप्रधानांवर टीका केली. पंतप्रधानांनी अत्यंत गंभीर आणि अराजकीय प्रसंगाचा वापर राजकीय विरोधकांवर टीका करण्यासाठी केला. सुरक्षा दलाचा गणवेश परिधान करून त्यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर अपशब्दांचा मारा केला,’ असे रमेश यांनी म्हटले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)