पीएमआय सात महिन्यांच्या उच्चांकावर; फेब्रुवारीमध्ये ६१.५, मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जानेवारीत ५६.७

गेल्या जुलैपासून एकूण उत्पादनातील वाढ ही सर्वात जलद होती, तर नवीन ऑर्डर सात महिन्यांत जलद गतीने आल्या आहेत
पीएमआय सात महिन्यांच्या उच्चांकावर; फेब्रुवारीमध्ये ६१.५, मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जानेवारीत ५६.७

नवी दिल्ली : देशातील खासगी क्षेत्राची कामगिरी अर्थव्यवस्थेला चालना देणारी असून फेब्रुवारीमधील पीएमआय जानेवारीच्या तुलनेत सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. एचएसबीसी फ्लॅश इंडिया कंपोझिट पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स आऊटपूट इंडेक्स फेब्रुवारीत ६१.५ या सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, असे एस ॲण्ड पी ग्लोबलने गुरुवारी सांगितले.

एचएसबीसी फ्लॅश इंडिया कंपोझिट पीएमआय आऊटपूट इंडेक्स- भारताच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रांच्या एकत्रित उत्पादनातील मासिक आधारावरील हंगामी समायोजित निर्देशांक जानेवारीत ६१.२ च्या वरून फेब्रुवारीमध्ये ६१.५ वर पोहोचला आहे. ५० वरील पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स विस्तार दर्शविते, तर ५० च्या खाली आकुंचन दर्शवते.

विशेष म्हणजे उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांत अर्थव्यवस्थेतील गती दिसून आली, असे एस ॲण्ड पी ग्लोबलने म्हटले आहे. भारताचा फ्लॅश मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जानेवारीत ५६.५ वरून फेब्रुवारीमध्ये ५६.७ वर पोहोचला. फ्लॅश सर्व्हिसेस पीएमआय बिझनेस ॲक्टिव्हिटी इंडेक्स जानेवारीच्या ६१.८ च्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ६२.० वर होता. एचएसबीसी फ्लॅश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय आउटपुट इंडेक्स जानेवारीच्या ५९.७ वरून या महिन्यात (फेब्रुवारी) ६०.४ पोहोचला आहे, असे एस ॲण्ड पी ग्लोबलने म्हटले आहे.

गेल्या जुलैपासून एकूण उत्पादनातील वाढ ही सर्वात जलद होती, तर नवीन ऑर्डर सात महिन्यांत जलद गतीने आल्या आहेत, असे एस ॲण्ड पी ने सांगितले. एस ॲण्ड पी द्वारे सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांनी या महिन्यातील वाढीचे श्रेय मागणी वाढवणारी परिस्थिती, तंत्रज्ञानातील गुंतवणूक, कार्यक्षमतेत वाढ, विस्तारीत ग्राहक आणि अनुकूल विक्री घडामोडींना दिले.

उत्साहाचे कारण म्हणजे नवीन निर्यात ऑर्डर्स मोठ्या प्रमाणावर वाढल्या, त्या विशेषत: वस्तू उत्पादकांसाठी. त्याचबरोबर उत्पादन खर्च गेल्या साडेतीन वर्षांत खूपच कमी राहिला. त्यामुळे उत्पादकांना लाभ झाला कारण उत्पादन किमती काही प्रमाणात कमी करण्यात आल्या आणि नफ्यात सुधारणा झाली, असे एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले.

फ्लॅश पीएमआयसाठी आकडेवारी ९-१९ फेब्रुवारी दरम्यान गोळा करण्यात आली. फ्लॅश पीएमआय डेटा काढताना एकूण प्रतिसादांच्या ८०-९० टक्क्यांनी दिलेल्या अंतिम आकडेवारीवरून अचूक प्रारंभिक संकेत काढले जातात.

भारतातील खासगी क्षेत्रातील नवीन ऑर्डर फेब्रुवारीमध्ये सलग ३१व्या महिन्यात वाढल्या आहेत. नवीन ऑर्डरमधील विस्ताराचा दर जानेवारीप्रमाणेच सात महिन्यांतील संयुक्त-सर्वोत्तम होता. सेवा कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या तुलनेत विक्रीत मजबूत वाढ नोंदवली, असे एस ॲण्ड पी ग्लोबलने म्हटले आहे.

नवीन ऑर्डर वाढली असतानाही फेब्रुवारीमध्ये अतिरिक्त कामगारांची भरती करण्याचे कंपन्यांनी टाळले. जानेवारीपासून वेतनावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येत बदल झाला नाही. त्यामुळे रोजगार निर्मितीचा सलग २० महिन्यांचा आलेख थांबला, असेही एस ॲण्ड पी ग्लोबलने अहवालात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in