चीनमधील न्यूमोनिया : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, पुरेशा सावधगिरीचा मुद्दा म्हणून श्वसनाच्या आजारांविरुद्ध तयारीच्या उपायांचे सक्रियपणे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनमधील न्यूमोनिया : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : चीनमधील न्यूमोनियाच्या लागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सार्वजनिक आरोग्यसेवांच्या तयारीबद्दल आढावा घेण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. उत्तर चीनमध्ये न्यूमोनियाचा हा आजार तेथील मुलांमध्ये वाढल्याचे वृत्त आहे, त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने ही पावले उचलली आहेत.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, पुरेशा सावधगिरीचा मुद्दा म्हणून श्वसनाच्या आजारांविरुद्ध तयारीच्या उपायांचे सक्रियपणे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. "सध्या सुरू असलेला इन्फ्लूएन्झा आणि हिवाळ्याचा हंगाम लक्षात घेता हे महत्त्वाचे आहे की, ज्यामुळे श्वसनाच्या आजाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे अर्थात कोणत्याही धोक्याची शक्यता नसल्याचेही मंत्रालयाने सूचित केले आहे.

या संबंधात केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांना पत्रे लिहिली आहेत. इन्फ्लूएन्झासाठी बेड, औषधे आणि लस, वैद्यकीय ऑक्सिजन, प्रतिजैविक, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे, चाचणी किट आणि पॅथॉलॉजी कर्मचाऱ्यांची उपलब्धता, ऑक्सिजन यंत्रणा आणि व्हेंटिलेटर आदींची सज्जता याबद्दल आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला सामायिक केलेल्या कोविड-१९ च्या संदर्भात काळजी घेण्यासंबंधातील सुधारित सूचना व त्या अनुषंगाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व श्वसनसंबंधित आजार याबद्दलही अवलोकन करीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही चीनकडून न्यूमोनियाच्या त्या लागणीसंबंधात माहिती मागविली आहे. अर्थात त्यामुळे कोणत्याही धोक्याची सूचना त्यातून मिळत आहे असे समजू नये, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in