नवी दिल्ली : पोक्सो गुन्हा तडजोडीने रद्द करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोपी शिक्षकाला राजस्थान हायकोर्टाने दिलासा दिला होता. तो राजस्थान हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्द केला.
न्या. सी. टी. रवीकुमार आणि पी. व्ही. संजय कुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
आरोपी व पीडितेच्या कुटुंबामध्ये झाली तडजोड
राजस्थानमध्ये एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले होते. या मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुलीचे कुटुंब व आरोपीमध्ये तडजोड झाली. त्यानंतर हे प्रकरण रद्द करण्यासाठी आरोपीने राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आरोपीची याचिका स्वीकार करून त्याच्याविरोधातील याचिका रद्द केली.
आरोपी व पीडित मुलीच्या कुटुंबातील तडजोडीला आक्षेप घेत याप्रकरणी रामजी लाल बैरवा यांनी याचिका दाखल करून उच्च न्यायालयाच्या आदेशावर आक्षेप घेतला. या प्रकरणात तिसरा पक्ष याचिका दाखल करू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. मात्र, नंतर याचिकादाराने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चौकशी करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला व आरोपी व पीडितेच्या वडिलांना याप्रकरणी पक्षकार बनण्याचे आदेश न्यायालयाने दिले.