टिकली, लिपस्टिक, बांगड्या : परीक्षेसाठी नववधू बनून आला तरूण, झाली अटक

परीक्षेदरम्यान कॉपी करण्यासाठी लोक अशा पद्धतींचा अवलंब करतात की ऐकूनही आश्चर्य वाटते.
टिकली, लिपस्टिक, बांगड्या : परीक्षेसाठी नववधू बनून आला तरूण, झाली अटक

परीक्षेदरम्यान कॉपी करण्यासाठी लोक अशा पद्धतींचा अवलंब करतात की ऐकूनही आश्चर्य वाटते. पंजाबमधील फरीदकोटमध्ये अशाच एका तरुणाला अटक करण्यात आली आहे, जो चक्क स्त्रीच्या वेशात, तेही नववधू बनून परीक्षेला बसला होता.

बाबा फरीद विद्यापीठाने (बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस) पॅरामेडिकल कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेत फाजिल्का येथील रहिवासी अंग्रेज सिंह (वय -25) हा मुलीच्या वेशात आला होता. ही परीक्षा 7 जानेवारी रोजी डीएव्ही पब्लिक स्कूल, कोटकपुरा येथे घेण्यात आली.

लिपस्टिक, टिकली आणि बांगड्या घालून परीक्षेला बसला

मुलगी म्हणून परीक्षा देण्यासाठी आलेल्या अंग्रेज सिंह याने ओठांवर लिपस्टिक आणि कपाळावर टिकलीही लावली होती. शिवाय, हातात बांगड्या आणि लेडीज सूट घालून तो परीक्षेला बसला होता. अंग्रेज सिंह ज्या मुलीच्या जागी परीक्षा देण्यासाठी आला होता तिचे नाव परमजीत कौर असे असून ती फाजिल्का येथील रहिवासी असल्याचे बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचे कुलगुरू डॉ राजीव सूद यांनी सांगितले.

बायोमेट्रिकमुळे झाला खुलासा

बायोमेट्रिक यंत्रावरील महिला उमेदवाराच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने त्याच्यावर संशय आला. तपासाअंती, त्याने मेकअप करून महिला उमेदवाराची तोतयागिरी केल्याचे उघड झाले. त्याच्याकडे बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रही मिळाले. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याचबरोबर अशा प्रकारे परीक्षेत फसवणूक करणाऱ्यांचे मोठे नेटवर्क असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही असे प्रकार उघडकीस आले आहेत. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. याशिवाय खऱ्या उमेदवाराचा अर्जही विद्यापीठ प्रशासनाने रद्द केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून तक्रार आल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतर कारवाई केली जाईल.

दरम्यान, आता स्त्रीच्या वेशात परीक्षेत आलेल्या अंग्रेज सिंहचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in