दिल्लीतील इस्त्राइल दुतावासाजवळ स्फोट झाल्याचा पोलिसांना फोन; चौकशी सुरु  

घटनास्थळी गेल्यावर स्फोट झाल्याची पुष्टी झाली नसून स्फोटाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली आहे. पोलीसांकडून संपूर्ण परिसरात चौकशी केली जात असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
दिल्लीतील इस्त्राइल दुतावासाजवळ स्फोट झाल्याचा पोलिसांना फोन; चौकशी सुरु

 

दिल्ली पोलिसांना शहरातील चाणक्यपूरी भागातील इस्राइल दुतावासाजवळ स्फोट झाल्याचा फोन आला होता. दुतावासाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर हा स्फोट झाला असल्याचे सांगण्यात आले. यानंतर अग्निशमन दल, गुन्हे युनिट आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, या ठिकाणी काहीही आढळून आले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना एका व्यक्तीने फोन करुन इस्त्राइल दुतावासाजवळ स्फोट झाल्याचे सांगितले. यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी गेल्यावर स्फोट झाल्याची पुष्टी झाली नसून स्फोटाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली आहे. पोलीसांकडून संपूर्ण परिसरात चौकशी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत.

दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, दिल्ली अग्निशमन सेवेला आज संध्याकाळी चाणक्यपुरी भागातील इस्राइल दुतावासाजवळ स्फोट झाल्याचा कॉल आला. मात्र, घटनास्थळी काहीही आढळून आले नाही. या ठिकाणी काश्मीर भवन देखील आहे. त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या सांगण्यानुसार, लोकांनी त्यांना मोठा आवाज ऐकल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरु असून हा आवाज नेमका कसला होता हे तपासानंतर कळेल.

इस्राइल दुतावासाकडून मोठा आवाज झाल्याची पुष्टी

इस्राइल दुतावासाच्या प्रवक्त्याने मोठा आवाज झाल्याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, “हा, अशी एक घटना घडली होती. ते नेमकं काय होतं त्याबाबत मला कल्पना नाही. पोलीस आणि आमच्या सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.”

दरम्यान, या घटनेत इस्राइल दुतावासाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नसून इस्राइल आणि भारतीय यंत्रणा या घटनेच्या चौकशीत एकमेकांना सहकार्य करत आहेत, अशी माहिती इस्त्राइलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in