गुजरातमधील आपच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी

दौऱ्यापूर्वी पोलिसांनी आपच्या कार्यालयावर छापा टाकत दोन तास झाडाझडती केली
गुजरातमधील आपच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी

गुजरातमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असल्यामुळे दिल्ली, पंजाबनंतर गुजरातमध्ये सत्तेत येण्यासाठी ‘आप’ पक्षाने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यात आता गुजरातमधील आपच्या कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. “आपल्याला मिळत असलेला पाठिंबा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे,” असा टोला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.

गुजरात पोलिसांनी रविवारी अहमदाबाद येथील आपच्या कार्यालयावर छापेमारी केली. याबाबत ‘आप’चे नेते इसुदान गढवी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. “अरविंद केजरीवाल यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी आपच्या कार्यालयावर छापा टाकत दोन तास झाडाझडती केली. तसेच, आम्ही पुन्हा येऊ, असेही पोलिसांनी म्हटले आहे.”त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “गुजरातमध्ये आपला नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. हे पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दिल्लीनंतर गुजरातमध्येही छापेमारी सुरू झाली आहे. दिल्लीत काही सापडले नाही, गुजरातमध्येही काही मिळाले नाही. आम्ही प्रामाणिक देशभक्त आहोत.”

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in