हिंमत असेल तर पेटवून दाखव! विवाहबाह्य संबंधात असलेल्या पोलिसाने प्रेयसीला दुसऱ्या प्रियकराबद्दल विचारले, जळून मृत्यू झाला

राणी 2020-21 मध्ये बसवनगुडी पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होती. संजय देखील याच ठाण्यात तैनात होता. या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि ते रिलेशनशीपमध्ये आले.
हिंमत असेल तर पेटवून दाखव! विवाहबाह्य संबंधात असलेल्या पोलिसाने प्रेयसीला दुसऱ्या प्रियकराबद्दल विचारले, जळून मृत्यू झाला

बंगळुरुमधील मुख्यमंत्री कार्यालयातील एका ३० वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कथितपणे प्रेयसीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याच्या काही दिवसांनंतर,उपचार सुरू असताना गुरूवारी मृत्यू झाला. आर. संजय असे मृताचे नाव असून तो त्यागराजनगरमध्ये (मूळ -चन्नरायपटना) वास्तव्यास होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राणी (३५, ) हिला अटक केली आहे. ती मंड्या जिल्ह्यातील आहे.

मयत संजय आणि राणी यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. राणी ही विवाहित असून तिला दोन मुले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, राणी 2020-21 मध्ये बसवनगुडी पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होती. संजय देखील याच ठाण्यात तैनात होता. या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि ते रिलेशनशीपमध्ये आले. नंतर राणी बेलंदूरमध्ये एका खासगी सुरक्षा एजन्सीत सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाली. त्यानंतरही दोघांचे नाते कायम होते. राणी संजयला त्याच्या घरी भेटायला जायची. तर, संजयही तिच्या घरी भेटण्यास जात असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी संजय सकाळची शिप्ट संपवून घरी जात असताना त्याला राणीचा फोन आला. तिने त्याला संध्याकाळी सहा वाजता तिच्या घरी येण्यास सांगितले. त्या दिवशी राणीचा पती बाहेरगावी गेला होता. ठरल्यानुसार संजय राणीच्या घरी पोहोचला, दोघे एकत्र असताना कथितपणे राणीला एका पुरुषाचा फोन आला. संजयने याबाबत विचारणा केल्यावर तिने आपल्या मित्राचा फोन असल्याचे सांगितले. यानंतर संजयने बळजबरी राणीचा फोन तपासला असता राणीचे त्या पुरुषासोबतचे खासगी संभाषण आढळून आले. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

हिंमत असेल तर पेटवून दाखव-

संजयने मृत्यूआधी पोलिसांना सांगितल्यानुसार, राणीने त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जाळून टाकण्याची धमकी दिली होती. हे त्याने आव्हान म्हणून स्वीकारले, पेट्रोलची बाटली आणून दिली आणि हिंमत असेल तर पेटवून दाखव असे राणीला सांगितले. यानंतर राणीने संजयवर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. त्यानंतर स्वतःच आग विझवून संजयला स्वतःच्या दुचाकीवरुन रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, रुग्णालयाकडून पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली.

तथापि, संजयने पोलिसांना 7 डिसेंबर रोजी, सदोष LPG गॅस स्टोमुळे आग लागल्याचे सांगितले होते. मात्र, 19 डिसेंबर रोजी त्याने याबाबत आपला जबाब बदलत राणीनेच आग लावल्याचा आरोप केला. दुसरीकडे, राणीने आरोप नाकारल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 'मी संजयला आग लावली नाही.उलट त्याने स्वत:च पेट्रोल ओतून पेटवून घेतले आणि मी आग विझवून त्याला रुग्णालयात दाखल केले', असे राणीचे म्हणणे आहे. दरम्यान, संजयच्या मृत्यूनंतर पोलिसांनी राणीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in