झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग; सत्ताधारी आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवले

सीएम हाऊसमधून तीन लक्झरी बसच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले
झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग; सत्ताधारी आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवले

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होण्यासंबंधीची अधिसूचना कोणत्याही वेळी जारी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने पाठवलेल्या शिफारशीच्या आधारावर राज्यपाल रमेश बैस यांनी सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याची कारवाई केली. यामुळे झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपकडून महाराष्ट्राप्रमाणेच आमदार फोडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेस व झामुमोच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

झारखंडमधील होऊ घातलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सीएम हाऊसमधून तीन लक्झरी बसच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बसमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह काँग्रेस व झामुमोचे ३६ आमदार होते.

या तिन्ही बस पोलीस सुरक्षेत खुंटीच्या लतरातू डॅम भागात नेण्यात आल्याचे समजते. तिथे एक तात्पुरते रिसॉर्ट तयार करण्यात आले असून, या रिसॉर्टमध्ये हे आमदार थांबतील. यासाठी या भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दावा केला की, “या बसमध्ये केवळ ३३ आमदार आहेत. सत्ताधाऱ्यांचे १० ते ११ आमदार अजूनही संपर्कात नाहीत.”

राज्यसभा खासदार महुआ माजी यांनी सांगितले की, “ऑपरेशन लोटस सुरूच राहणार. महाराष्ट्रात झाले, दिल्लीत प्रयत्न झाला. बिहारमध्येही प्रयत्न करण्यात आला. अनेक ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्व आमदार एकत्र आलेत.”

भाजप गुन्हा दाखल करणार

भाजपने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व गेल्यास त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे भाजपने म्हटले आहे.

सध्या झामुमोच सर्वात मोठा पक्ष

सोरेन यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राज्यपाल राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतील. संख्याबळाच्या आधारावर सध्या झारखंडमध्ये झामुमो हाच सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे साहजिकच राज्यपालांना सोरेन यांच्याच झामुमोला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावे लागेल. सद्य:स्थिती लक्षात घेऊन झामुमोने यापूर्वीच आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे समर्थन पत्र तयार करवून घेतले आहे. झामुमो व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या असून ४२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र या आघाडीकडे तयार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in