
नवी दिल्ली: मोदी आडनाव मानहानी खटल्यातून दिलासा मिळालेल्या राहुल गांधी यांनी संसदेत आक्षेपार्ह वर्तन केल्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मणिपूर प्रश्नावरुन सरकारचे वाभाडे काढणारे राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. आतापर्यंत कुठल्याही खासदाराने असे लज्जास्पद वर्तन सभागृहात केले नव्हते. राहुल गांधी यांच्या वर्तनाने आज शरमेने मान खाली गेल्याची टिप्पणी करत महिलांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधी यांना सभागृहात येण्याचा अधिकार आहे का? असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.
लोकसभेत तेव्हा काय घडले
केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी फार कठोर शब्दात भाषण केले. भारतमाता ही माझी आई आहे. मणिपूर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. या सरकारने मणिपूरचे दोन तुकडे केले आहेत. म्हणजे या सरकारने माझ्या आईचेच तुकडे केले आहेत, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी भारत जोडो यात्रा, अदानी प्रकरण आणि धगधगते मणिपूर अशा प्रश्नांना हात घातला.
मात्र राजस्थानवर दौऱ्यावर जायचे असल्याने राहुल गांधी यांनी आपले भाषण आटपून लगोलग लोकसभेतून काढता पाय घेतला. सदनातून बाहेर पडत असताना त्यांच्या हातातले काही कागदपत्रे खाली पडली. संबंधित कागदपत्रे घेण्यासाठी ते खाली वाकले. त्यावेळी भाजप खासदार त्यांच्यावर फिदीफिदी हसले. त्यावर राहुल गांधी यांनी समोरील सत्ताधारी भाजप खासदारांकडे पाहून स्मितहास्य केले आणि फ्लाईंग किसप्रमाणे इशारा केला. मात्र लोकसभेच्या एक्झिट दरवाजाजवळ कोणताही कॅमेरा नसल्याने हा प्रसंग चित्रित होऊ शकला नाही. राहुल गांधी भाषण आटपून निघाले त्यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नुकत्याच बोलायला उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसच्या धोरणांवर सडकून प्रहार केले तसेच राहुल गांधी यांना लक्ष्य केले. सरतेशेवटी भाषण संपविताना त्यांनी राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. तोपर्यंत राहुल गांधी यांना लोकसभेबाहेर पडून सुमारे अर्ध्या तासांहून अधिक काळ लोटून गेला होता. अर्ध्या तासांनंतर स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या कृत्यावर आक्षेप घेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.