भ्रष्टाचार आणि विभाजनाचे राजकारण हा काँग्रेसचा प्राणवायू - माेदी

जनतेला काँग्रेसबद्दलचे सत्य माहीत आहे आणि ते त्यांच्या हेतूंमध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत.
भ्रष्टाचार आणि विभाजनाचे राजकारण हा काँग्रेसचा प्राणवायू - माेदी
@ANI

झाबुआ : काँग्रेस सत्तेत असताना लूटमार करते, सत्तेबाहेर असताना समाजात भाषा, प्रदेश आणि जातीच्या आधारे फूट पाडते. भ्रष्टाचार आणि विभाजनाचे राजकारण हा काँग्रेसचा प्राणवायू आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात आदिवासी समुदायाच्या सदस्यांच्या जाहीर सभेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जनतेला काँग्रेसबद्दलचे सत्य माहीत आहे आणि ते त्यांच्या हेतूंमध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. काँग्रेस स्वतःच्या पापात बुडाली आहे आणि जितके वर येण्यासाठी प्रयत्न करेल तितकी ती खाली घसरेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० जागांचा आकडा पार करेल आणि सत्ताधारी आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर सभेत व्यक्त केला.

आपण झाबुआ येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलो नसून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी ‘सेवक’ म्हणून आलो आहोत, असे मोदी म्हणाले. आमचे 'डबल इंजिन' सरकार मध्य प्रदेशात दुप्पट गतीने काम करत आहे. असे सांगत त्यांनी सुरुवातीला ७५५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. गरीब, शेतकरी आणि आदिवासींकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्ष काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसला फक्त निवडणुकीच्या वेळी गावे, गरीब आणि शेतकरी आठवतात. त्यांच्या जवळच्या पराभवाची जाणीव करून, काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष शेवटचे डावपेच वापरत आहेत. पंतप्रधान म्हणाले की, ‘लूट करा आणि फूट पाडा’ हे काँग्रेसचे ब्रीदवाक्य आहे. आम्ही मतांसाठी नव्हे, तर आदिवासींच्या आरोग्यासाठी सिकलसेल ॲनिमियाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे, असे ते म्हणाले. केंद्राने गेल्या वर्षी राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मिशन २०४७ सुरू केले.

logo
marathi.freepressjournal.in