डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनावरून राजकारण

देशाच्या आर्थिक सुधारणांचे जनक आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. मनमोहन सिंग
डॉ. मनमोहन सिंग संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक सुधारणांचे जनक आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध राजकीय पक्षांचे नेते अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले. मात्र, अंत्यविधी झाल्यानंतर काँग्रेसने आता सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांचा आदर ठेवला नाही, असे म्हटले आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान करणारे लोक आता त्यांच्या अस्थी विसर्जनावरूनही घृणास्पद राजकारण करत आहेत. कुटुंबाची गोपनियता जपण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी कुटुंबासोबत गेले नाहीत. पण त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीत त्यांना असे समजले की, अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या कुटुंबीयांची कोणतीही गोपनियता जपली गेली नाही.

आम्ही डॉ. सिंग यांच्या कुटुंबाची गोपनियता जपली - काँग्रेस

यावर आता काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे. कुटुंबाच्या गोपनियतेचा आदर करीत पक्षाचा कोणताही वरिष्ठ नेता डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलशाच्या विसर्जनासाठी कुटुंबासोबत गेला नाही. डॉ. सिंग यांच्या अस्थींचे शिख प्रथेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी नदीत विसर्जन केले.

काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कुटुंबाच्या गोपनियतेचा आदर करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी कुटुंबासोबत गेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, सिंग यांच्या अंत्यसंस्कारानंतर सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांनी त्यांच्या निवासस्थानी कुटुंबाची भेट घेतली.

अस्थी विसर्जनाला काँग्रेसचा एकही मोठा नेता नव्हता - भाजप

डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलश विसर्जनासाठी कोणताही काँग्रेसचा नेता गेला नाही. यावरून आता भाजपने काँग्रेसवर आरोप केले आहेत. गांधी घराण्यातील एकही सदस्य आणि काँग्रेसचा एकही मोठा नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असा आरोप भाजपने केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावरून काँग्रेस वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी रविवारी केला.

राहुल गांधी ‘थर्टी फर्स्ट’साठी व्हिएतनामला गेले - भाजप

आपल्या राजकीय लाभासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मृत्यूचा वापर केला आणि ते नववर्षाच्या स्वागतासाठी व्हिएतनाम येथे गेले, असा आरोप भाजपने केला आहे. त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर देताना सवाल केला की, संघपरिवार जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचे राजकारण कधी थांबवणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in