नवी दिल्ली : दिल्लीत प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. मंगळवारी दिल्लीतील अनेक भागात हवा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) ५०० च्यावर नोंदला गेला, तर दिल्लीचा सरासरी ‘एक्यूआय’ ४९४ वर पोहोचला.
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने आपल्या कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीचा केला आहे. शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा केंद्र व दिल्ली सरकारला कठोर उपाययोजना करण्यास बजावले आहे.
दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी केली आहे. राय यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना सांगितले की, दिल्लीत प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या समस्येतून सोडवणूक करण्यासाठी कृत्रिम पाऊस गरजेचा आहे.
प्रदूषणामुळे अपघात
नोएडात प्रदूषण व धुक्यामुळे ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस-वेवर मंगळवारी सकाळी अनेक अपघात झाले. दृश्यमानता कमी झाल्याने एक ट्रक दुभाजकावर चढला. या ट्रकच्या मागे येत असलेली चार एसयूव्ही वाहने व काही दुचाकी एकमेकांवर आदळल्या. या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले.