
गुवाहाटी : आसामचे लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांचे शुक्रवारी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गर्ग यांच्या मृत्यूमुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
गर्ग यांना स्कूबा डायव्हिंग करताना दुखापत झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अतिदक्षता विभागात त्यांचे निधन झाले.
सिंगापूरला ते तीन दिवसीय नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. स्कूबा डायव्हिंग करताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना लगेच सीपीआर देण्यात आला व सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलच्या आयोजकांनी सांगितले.
वेदनादायी वृत्त - मुख्यमंत्री सर्मा
हे अतिशय वेदनादायी वृत्त आहे. गर्ग यांच्या निधनाने राज्य आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आसामने आपला लाडका मुलगा गमावला आहे. जुबिन आमच्यासाठी काय होते हे शब्दांत मांडता येणार नाही. ते खूप लवकर निघून गेले; ही जाण्याची वेळ नव्हती. जुबिन यांच्या आवाजात लोकांना ऊर्जा देण्याची अद्वितीय ताकद होती. त्यांचे संगीत थेट आपले मन आणि आत्म्याशी बोलत असे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. भविष्यातील पिढ्या त्यांना आसामच्या संस्कृतीचे आधारस्तंभ म्हणून लक्षात ठेवतील, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले.