पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर देशभर सर्वत्र छापे;टेरर फंडिंगचा आरोप

एनआयए, ईडी आणि राज्य पोलिसांच्या या छाप्याविरोधात पीएफआयचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर देशभर सर्वत्र छापे;टेरर फंडिंगचा आरोप

टेरर फंडिंगच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि ईडीने संयुक्तपणे गुरुवारी मध्यरात्रीपासून १३ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या अनेक ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईत संघटनेचा प्रमुख ओमा सालम याच्यासह पीएफआयच्या १०६ सदस्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, पुद्दुचेरी आणि राजस्थानात ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृह सचिव अजय भल्ला, एनआयएचे महानिदेशक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.

एनआयए, ईडी आणि राज्य पोलिसांच्या या छाप्याविरोधात पीएफआयचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. केरळमधील मल्लापुरम, तामिळनाडूतील चेन्नई, कर्नाटकातील मंगळुरूसह अनेक ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे पीएफआयने निवेदन जारी केले आहे. केंद्रीय यंत्रणा आम्हाला त्रास देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कर्नाटकातील उडुपीमध्ये हिजाबचा वाद सुरू झाला होता.

महाराष्ट्रात २० जणांना अटक

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएने गुरूवारी पहाटे राज्यातही पीएफआय संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्वपूर्ण ठिकाणांवर राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा (एनआयए) आणि स्थानिक पोलिसांनी छापे टाकले. नवी मुंबई, भिवंडी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना, मालेगाव येथे केलेल्या कारवाईत २० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली आहे. छाप्यात मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डाटाही जप्त करण्यात आला आहे.

गुरूवारी पहाटे तीन वाजल्यापासून देशभरात एनआयएने छापेमारी सुरू केली. पीएफआयशी संबंधित कार्यकर्ते, त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. एनआयएने पुण्यातून कयूम शेख आणि रझी अहमद खान या दोघांना अटक केली आहे. दोघांना घेऊन एनआयएचे पथक नाशिकला रवाना झाले आहे. तसेच, सैफुर रहमान या पीएफआयच्या नाशिक जिल्हा अध्यक्षाला महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले आहे. आरोपींवर समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होणे, राज्याविरोधात कट रचणे, अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पॉप्युलर फ्रंट इंडिया (पीएफआय) ची स्थापना २००७ मध्ये केरळमध्ये झाली. १९९२ मध्ये बाबरी मशिद पाडल्यानंतर स्थापन झालेल्या नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट ऑफ केरळ, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि मनिथा नीथी पसराय ऑफ तमिळनाडू या तीन संघटनांच्या विलिनीकरणातून पीएफआय स्थापन झाली आहे. ही संघटना दहशतवादी कृत्यांसाठी निधी पुरवणे, सदस्यांसाठी प्रशिक्षण देणे, संघटनेत सामील करून घेण्यासाठी धर्मांतर करणे आदी मार्गांनी सक्रिय असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. सुरुवातीला ही संघटना केवळ दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कार्यरत होती; परंतु आता ती उत्तर प्रदेश, बिहारसह २० राज्यांमध्ये कार्यरत आहे. याच संघटनेचा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष २००९ मध्ये स्थापन झाला. या पक्षाने उडुपी जिल्ह्यात तीन नगरपरिषदा जिंकत आपले राजकीय बस्तान बसवायला सुरवात केली. याशिवाय कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया आणि नॅशनल विमेन्स फ्रंट अशा संघटनाही कार्यरत आहेत. पीएफआयचे मुख्यालय दिल्लीत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in