दिवाळीपर्यंत ५जी सेवा मिळण्याची शक्यता, ५जी स्पेक्ट्रम लिलावाला मान्यता

दूरसंचार मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार ७२ GHz स्पेक्ट्रमचा पुढील २० वर्षांसाठी लिलाव केला जाणार आहे.
दिवाळीपर्यंत ५जी सेवा मिळण्याची शक्यता, ५जी स्पेक्ट्रम लिलावाला मान्यता

यावर्षी दिवाळीपर्यंत लोकांना ५जी सेवांची भेट मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक कामकाज समितीच्या बैठकीत ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी देण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्या बऱ्याच दिवसांपासून ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची वाट पाहत होत्या. दूरसंचार मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार ७२ GHz स्पेक्ट्रमचा पुढील २० वर्षांसाठी लिलाव केला जाणार आहे. लिलावात यशस्वी होणारी कंपनी याद्वारे ५जी सेवा देऊ शकणार आहे. सध्याच्या ४जी सेवेपेक्षा या सेवेचा वेग १० पट असेल.

या निर्णयामुळे देशातील दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती सुरू होणार आहे. या अंतर्गत, दूरसंचार मंत्रालय या आठवड्यापासून इच्छुक दूरसंचार कंपन्यांकडून अर्ज मागवणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जुलै महिन्यात लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी स्पेक्ट्रमची एकूण किंमत ५ लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याअंतर्गत सरकार नऊ स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. हा लिलाव २० वर्षांसाठी असेल.

ेशात ५जी सेवा सुरू करण्याची तारीख अद्याप ठरलेली नाही, परंतु सरकारच्या आदेशानुसार, स्पेक्ट्रम खरेदी करणाऱ्या कोणत्याही कंपनीला ६ महिने ते १ वर्षाच्या आत सेवा सुरू करावी लागेल. अनेक टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांची तयारी पूर्ण केली आहे, त्यामुळे ते स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर तीन ते सहा महिन्यांत सेवा सुरू करू शकतात. या लिलावात टेलिकॉम कंपन्या ६०० ते १८००मेगाहर्ट्झ बँड आणि २१००, २३००, २५०० मेगाहर्ट्झ बँडच्या लिलावासाठी अर्ज करतील. भारत सरकारने आधीच ५जी स्पेक्ट्रमच्या कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसह प्रगत सेवांची चाचणी घेतली आहे.

मुंबई-पुण्यात पुढील वर्षापर्यंत

५जी सुरू होणार सेवा

तीन मोठ्या खासगी दूरसंचार कंपन्या भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया भारतात ५जी इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी काम करत आहेत. या तिन्ही कंपन्यांनी एरिक्सन आणि नोकियासोबत मिळून मोबाइल अ‍ॅ​​​​​​क्सेसरीज बनवण्याचे काम सुरू केले आहे. देशात मुंबई - पुणे या महानगरांमध्ये सर्वात आधी ५जी सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in