नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडात निर्माण झालेल्या तणावानंतर बंद केलेली व्हिसा सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही देशांतील संबंध पुन्हा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न केले जात असून काही दिवसांत त्यांत सुधारणा होईल, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.
निज्जर प्रकरण उद्भवल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. तसेच एकमेकांच्या नागरिकांना व्हिसा देणे बंद केले होते. आता हळूहळू दुरावलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात असून लवकरच व्हिसा सेवा पुन्हा सुरू होऊ शकेल, असे संकेत जयशंकर यांनी दिले.
जस्टीन ट्रुडो अकार्यक्षम
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे अकार्यक्षम असल्याचा आरोप तेथील विरोधी पक्षाचे नेते पियरी पॉलिव्र यांनी केला आहे. तसेच आपण भारताबरोबरील संबंध पूर्ववत करू, असेही म्हटले आहे. नमस्ते रेडिओ टोरंटो नावाच्या नेपाळी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.