दिल्ली विमानतळावर वीज गायब

दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक वीज गायब झाली. त्यामुळे प्रवाशांचे ‘बोर्डिंग’ व ‘चेक इन’ रखडले. तसेच ‘डीजी यात्रा’ हे ॲप चालत नसल्याचा अनुभव प्रवाशांना आला.
दिल्ली विमानतळावर वीज गायब
Published on

नवी दिल्ली : दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक वीज गायब झाली. त्यामुळे प्रवाशांचे ‘बोर्डिंग’ व ‘चेक इन’ रखडले. तसेच ‘डीजी यात्रा’ हे ॲप चालत नसल्याचा अनुभव प्रवाशांना आला. मात्र, यामुळे विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. वीज गायब झाल्याने सामान संकलन व प्रवेशद्वारावर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. टर्मिनलमधील एसी बंद झाल्याने प्रवासी घामाघूम झाले. अनेक प्रवाशांनी झालेल्या प्रकाराला ‘एक्स’वरून वाचा फोडली. टी-३ टर्मिनलवर १५ मिनिटे वीज गायब झाली. तसेच ‘डीजी यात्रा’ ॲप चालत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. वीज गायब झाल्याने ‘चेक इन काऊंटर’वर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ग्रीड कोलमडल्याने वीज गेली

विजेचे ग्रीड कोलमडल्याने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मिनिटांसाठी वीज गेली, तर बॅकअपनंतर काही सेकंदात तिकीट काऊंटर व अन्य सुविधा पुन्हा सुरू झाल्याचा दावा विमानतळ प्राधिकरणाने केला आहे. मात्र, विमानतळावरील सर्व यंत्रणा बॅकअपवर जाण्यासाठी पाच मिनिटांचा कालावधी लागला. यामुळे विमानतळावर काही काळ एकच गोंधळ उडाला. आपत्कालीन परिस्थितीला तोंड द्यायला दिल्ली विमानतळावर दोन दिवसांचा पॉवर बॅकअप घेतला जातो.

logo
marathi.freepressjournal.in