
एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेतील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी २९ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे शुक्रवारी निवृत्त होत आहेत. म्हणजेच आता नव्या सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. गुरुवारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नव्हता. त्यामुळे पुन्हा शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी याचिका दाखल करत याप्रकरणी सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र, आज त्यांची मागणी मान्य झाली नाही. दरम्यान, याप्रकरणी २३ ऑगस्टला झालेल्या सुनावणीत ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.