प्रज्ञान रोव्हरने कापले ८ मीटरचे अंतर

चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून अभ्यासाला सुरुवात
प्रज्ञान रोव्हरने कापले ८ मीटरचे अंतर

बंगळुरू : भारताने चांद्रयान-३ मोहिमेद्वारे पाठवलेल्या प्रज्ञान रोव्हरने बुधवारी चंद्रावर अवतरण झाल्यापासून ८ मीटरचा प्रवास केल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी जाहीर केली. तसेच विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर त्याच्या अंतरंगातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडत असतानाचा व्हिडीओही इस्रोने जारी केला आहे.

चांद्रयान-३च्या विक्रम लँडरने बुधवारी सायंकाळी ६ वा. ०४ मिनिटांनी चंद्रावर पदार्पण केले. त्यानंतर साधारण दोन तासांनी विक्रम लँडरच्या अंतरंगातून २६ किलो वजनाचा प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला आणि त्याने चंद्राच्या भूमीवर फिरण्यास सुरुवात केली. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना प्रज्ञानच्या चाकांवर कोरलेला इस्रोचा लोगो आणि भारताचे अशोकचिन्ह या प्रतिमा चंद्राच्या मातीत उमटल्या. प्रज्ञान सध्या एका सेकंदाला एक सेंटीमीटर इतक्या वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करत आहे. या वेगाने प्रज्ञानने शुक्रवारपर्यंत ८ मीटरचे अंतर कापले. पदार्पणापासून आतापर्यंत विक्रम आणि प्रज्ञानवरील सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

विक्रम आणि प्रज्ञान चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस काम करण्यासाठी डिझाइन केले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आता दिवस असल्याने सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. त्या प्रकाशात प्रज्ञानवरील सौरपट (सोलर पॅनेल्स) चार्ज होऊन वीजनिर्मिती करतील. त्या जोरावर प्रज्ञान चंद्रावर फिरत राहील. १४ दिवसांनी चंद्रावर रात्र सुरू होईल. अंधारात प्रज्ञानचे सौरपट काम करणार नाहीत आणि त्याच्या बॅटरीचे चार्जिंग संपेल. त्यानंतर विक्रम आणि प्रज्ञानचे कार्य थांबेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्रीचे तापमान शून्याखाली २३८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. हे वातावरण सहन करून १४ दिवसांनी चंद्रावर पुन्हा दिवस उगवल्यावर जर प्रज्ञानची सोलर पॅनेल्स चार्ज झाली तर कदाचित तो पुन्हा काही वेळ फिरू शकेल, पण तो बोनस ठरेल, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

प्रज्ञानवर अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (अॅप्स) आणि लेझर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (लिब्स) अशी दोन प्रमुख उपकरणे आहेत. त्यांच्या मदतीने प्रज्ञान चंद्राच्या मातीचे रासायनिक गुणधर्म अभ्यासणार असून त्यातील मूलद्रव्यांचा शोध घेणार आहे. मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह या मूलद्रव्यांचा विशेषत: शोध घेतला जाणार आहे.

चांद्रयान-२ ने टिपली ती छायाचित्रे

भारताने २०१९ साली पाठवलेल्या चांद्रयान-२ चा ऑर्बिटर अद्याप चंद्राभोवती १०० किमीवरील कक्षेत फिरत असून, चंद्राची छायाचित्रे पाठवत आहे. त्याने चांद्रयान-३चा विक्रम लँडर चंद्रावर उतरत असतानाची छायाचित्रे घेतली आहेत. चांद्रयान-२च्या ऑर्बिटरवरील ऑर्बिटर हाय रिझोल्युशन कॅमेऱ्याने (ओएचआरसी) विक्रम आणि प्रज्ञानवर लक्ष ठेवले जात आहे. विक्रम चंद्रावर उतरत असताना नेमकी कशी छायाचित्रे घेतली, अशी शंका अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, ही छायाचित्रे चांद्रयान-२च्या ऑर्बिटरने घेतल्याचे इस्रोने स्पष्ट केल्याने या शंका मिटल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in