‘प्रज्ञान’चे चंद्रावर काम सुरू,लँडर विक्रमकडून देखरेख

रोव्हरमधील दोन पेलोड पाणी व धातूंचा तपास करण्यासाठी मदत करणार आहेत
‘प्रज्ञान’चे चंद्रावर काम सुरू,लँडर विक्रमकडून देखरेख

श्रीहरिकोटा : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या ‘चांद्रयान-३’मधील प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर आपले नेमून दिलेले काम सुरू केले. रोव्हरमधील दोन पेलोड पाणी व धातूंचा तपास करण्यासाठी मदत करणार आहेत. या प्रज्ञान रोव्हरवर विक्रम लँडर लक्ष ठेवत आहे.

या रोव्हरने सर्वात पहिल्यांदा आपले सोलर पॅनल उघडले. १ सेमी प्रतिसेकंद गतीने तो चालत आहे. आपल्या आजूबाजूच्या वस्तूंना तो स्कॅन करण्यासाठी दिशादर्शक कॅमेऱ्याचा वापर करत आहे. येत्या १२ दिवसांत तो अर्धा किलोमीटर अंतर कापणार आहे. रोव्हर डेटा सर्व माहिती गोळा करणार असून, तो लँडरला पाठवेल. नंतर लँडर ही माहिती पृथ्वीला पाठवेल. हा डेटा पाठवायला ‘चांद्रयान-२’च्या आर्बिटरची मदत घेतली जाईल.

चांद्रयान-३ मिशनचे तीन प्रकार आहेत. त्यात प्रॉपल्शन मॉड्यूल, लँडर व रोव्हर. यावर ६ पेलोड लावले आहेत. यातील एका पेलोडचे नाव ‘शेप’ आहे. तो यानाच्या प्रॉपल्शन मॉड्यूलवर लावला आहे. हा चंद्राच्या कक्षेत फिरून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनची चाचणी करत आहे, तर लँडरवर रंभा, चास्टे व इल्सा हे तीन पेलोड लावले आहेत, तर प्रज्ञानवर दोन पेलोड आहेत.

सोनिया गांधींकडून अभिनंदनाचे पत्र

‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी झाल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘इस्त्रो’ प्रमुख सोमनाथ यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले आहे. तुम्ही व तुमच्या टीमने अत्यंत चांगली कामगिरी केली, असे सोनियांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in