म्हैसूर (कर्नाटक) : कर्नाटकचे माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि त्यांचा पुत्र प्रज्वल रेवण्णा नव्याने अडचणीत सापडले आहेत. एका महिलेला बांधून प्रज्वल तिच्यावर बलात्कार करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार तिच्या मुलाने केल्यानंतर प्रज्वल आणि रेवण्णा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रज्वल आणि रेवण्णा यांच्याविरुद्ध गुरुवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या पिता-पुत्राविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा अगोदरच नोंदविण्यात आला आहे. रेवण्णा यांनी आपल्या आईचे अपहरण केल्याची तक्रार कृष्णराजनगरमधील एका २० वर्षीय युवकाने गुरुवारी रात्री नोंदविली.
रेवण्णा यांच्या घरी आपली आई सहा वर्षांपूर्वी काम करीत होती, असे या युवकाने सांगितले. जवळपास पाच दिवसांपूर्वी रेवण्णा यांचा विश्वासू साथीदार सतीश बबण्णा आमच्या घरी आला आणि पोलीस चौकशीसाठी कदाचित तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना काही सांगू नका, असे बबण्णा याने सांगितले. त्यानंतर २९ एप्रिल रोजी बबण्णा पुन्हा आमच्या घरी आला आणि तुम्हाला कारागृहात जावे लागेल, अशी भीती दाखवून तो आईला दुचाकीवरून घेऊन गेला. रेवण्णा यांनी बबण्णा याला तसे करण्यास सांगितले होते, असे युवकाने म्हटले आहे.
बबण्णा आईला घेऊन कोठे गेला ते आपल्याला माहिती नाही. त्यानंतर १ मे रोजी आपल्या आईला दोरीने बांधण्यात आल्याचा आणि प्रज्वल तिच्यावर बलात्कार करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपल्याला एका मित्राने सांगितले, असेही हा युवक म्हणाला. आपल्या आईच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी मदत करावी, अशी याचना युवकाने केली. त्यानंतर रेवण्णा आणि बबण्णा यांच्याविरुद्ध अपहरण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
बंदुकीचा धाक दाखवून प्रज्वलने बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप
कर्नाटकच्या हसन मतदारसंघातील जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा याने बंदुकीचा धाक दाखवून आपल्यावर बलात्कार केला आणि त्याचे भ्रमणध्वनीवर छायाचित्रण केल्याचा आरोप जेडीएसच्या एका महिला कार्यकर्तीने करून तशी तक्रार नोंदविल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने प्रज्वल याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रज्वल याने आपल्याला खासदारांसाठी असलेल्या निवासस्थानामध्ये नेले आणि तेथे बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला आणि त्याचे भ्रमणध्वनीवर छायाचित्रण केले, असे महिलने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची वाच्यता केल्यास आपल्याला आणि आपल्या पतीला ठार मारण्याची धमकीही प्रज्वल याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.