औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात काल छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचे आंदोलन झाले. या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून पुढील तपास करत आहेत. यासर्व प्रकरणावर एकीकडे राज्यभर विरोध होत असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यावर बोलताना म्हणाले की, "औरंगजेब या मातीतला नाही का? त्याचा जन्म मुघल काळातच झाला होता. त्याचे फोटो लावले म्हणून मला काही नवीन वाटत नाही. ज्यांना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करायचे आहे, ते या विरोधात बोलत असतील. जाती धर्मावर राजकारण झाले की, प्रादेशिक मुद्दे घेऊन राजकारण करतात," अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, औरंगजेबाचा फोटो झळकावणाऱ्या तरुणांपैकी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि रावसाहेब दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.