
इंदूर : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी घरवापसी कार्यक्रमाचे कौतुक केले होते. संघाने पुनर्परिवर्तनाचे कार्य केले नसते तर आदिवासींचा एक भाग देशद्रोही झाला असता, असे प्रणब मुखर्जी म्हणाले होते, असा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे.
ते राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस आणि विहिंपते नेते चंपत राय यांना हा पुरस्कार इंदूर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना भागवत म्हणाले, प्रणब मुखर्जी राष्ट्रपती होते. तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो होतो. संसदेत घरवापसीवरून प्रचंड घमासान सुरू होते. पण ते म्हणाले की तुम्ही काही लोकांना परत आणले आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. असे कसे करता तुम्ही, असे केल्याने वाद होतात. कारण ते राजकारण आहे. मीही आज जर काँग्रेस पक्षात असतो, राष्ट्रपती नसतो, तर मी संसदेत हेच केले असते. पण तुम्ही लोकांनी हे जे काम केले आहे (ते केले नसते तर) त्यामुळे भारतातील ३० टक्के आदिवासी देशद्रोही बनले असते.
“मनापासून धर्मांतर करायची इच्छा झाली तर काही हरकत नाही. प्रत्येक धर्म सारखाच आहे. प्रत्येक धर्म एकाच जागेवर पोहोचवतो. प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे. पण हे जबरदस्तीने होत असेल, तर याचा अर्थ आध्यात्मिक प्रगती होत नाही, असेही मुखर्जी म्हणाले होते, असा दावा मोहन भागवत यांनी केला.