

पाटणा/कोलकाता : जन सुराज्य पक्षाच्या माध्यमातून बिहारमध्ये वेगळा प्रयोग राबवत असल्याचा दावा करणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे चक्क दोन राज्यांचे मतदार असल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू असतानाच हे वृत्त आल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाल्याचे मानले जात आहे. पुढच्या महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशांत किशोर यांचे नाव बिहारमधील मतदारयाद्यांप्रमाणेच पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांमध्येही आहे. पश्चिम बंगालमधील मतदार यादीनुसार १२१, कालीघाट रोड हा त्यांचा पत्ता देण्यात आला आहे. हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातील परिसर असून भवानीपूरमधील पक्षाचे कार्यालयही याच परिसरात आहे. पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींचे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले होते.
दुसरीकडे बिहारमध्येदेखील प्रशांत किशोर यांचे नाव मतदार यादीमध्ये आहे. सासाराम लोकसभा मतदारसंघातील कारगहर विधानसभा मतदारसंघात किशोर यांचे नाव आहे. मध्य विद्यालय, कोनार या मतदान केंद्रावर त्यांचे मतदान होणार आहे. कोनार हे प्रशांत किशोर यांच्या वडिलांचे गाव आहे.
लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम १७ नुसार, कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये मतदार म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार नाही. याशिवाय कलम १८ नुसार, कोणत्याही व्यक्तीला एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नावनोंदणी करता येणार नाही. एकदा मतदार यादीसाठी नावनोंदणी झाली की त्यानंतर ८ क्रमांकाचा अर्ज करून मतदार स्थलांतरासारख्या कारणामुळे त्यांचे नाव एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणच्या यादीत समाविष्ट करू शकतात.
३ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश
प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार असल्याच्या दाव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणात पुढील तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांचे नाव बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर ही नोटीस बजावली आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर यांचे नाव दोन राज्यांमधल्या मतदार याद्यांमध्ये असल्याचे समोर आले असले, तरी निवडणूक आयोगासाठी मात्र ही बाब काही नवीन नाही. बिहारमध्ये ‘एसआयआर’ची सुरुवात करण्यामागे निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण नमूद करण्यात आले आहे. काही मतदार एका ठिकाणी नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. पण तिथे नोंदणी करताना आधीच्या मतदारसंघातील आपले नाव रद्द करत नाहीत, असे निवडणूक आयोगाने २४ जून रोजी मतदारांच्या विशेष फेरतपासणीसंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले होते.