
Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कोट्यवधी भाविकांना एकत्र आणणाऱ्या महाकुंभमेळाला आज (रविवार,19) आग लागली आहे. एएनआय वृत्त संस्थेने एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओत धुराचे मोठे लोट निघताना दिसत आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळाले असल्याचेही एएनआयने त्याच्या अद्ययावत वृत्तात म्हटले आहे.
कुंभ मेळ्यातील एका तंबूला आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
जगातील सर्वाधिक माणसांचा संगम करणाऱ्या हिंदू धर्मातील पवित्र महाकुंभमेळ्यास उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पौष पौर्णिमेच्या पवित्र स्नानाने (सोमवार, 13) सुरुवात झाली आहे. आयुष्यात एकदा तरी कुंभमेळ्यात स्नान करायला हवे या भावनेने कुंभमेळ्यास कोट्यवधी भाविक भेट देत आहेत. प्रयागराज येथे १३ जानेवारीला सुरू झालेला महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
अग्निशामक दल तसेच सुरक्षा यंत्रणा आग लागल्याच्या कारणांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या आगीत किती नुकसान झाले किंवा कोणत्याही जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती नाही.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली
प्रयागराज येथे लागलेल्या आगीच्या घटनेची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर झाले आहेत.
दर दिवशी दोन कोटी भाविक येण्याची अपेक्षा
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, स्नानाच्या दिवशी २ कोटीहून अधिक भाविक येतील. तर २९ जानेवारीला पौष अमावस्येला १० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.