

नवी दिल्ली: इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतात एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असतानाच आता तेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत. तेल कंपन्यांनी स्पीड आणि पॉवरसारख्या प्रीमियम पेट्रोल ब्रँडच्या दरात प्रति लिटर २.०९ रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ वेगवेगळ्या शहरांमध्ये लागू करण्यात आली असून पुण्यात प्रीमियम पेट्रोलचा दर प्रति लिटर ११३.७७रुपयांपर्यंत वाढला आहे. तर औद्योगिक डिझेलच्या दरात २२ रुपयांनी वाढ करण्यात आली.
दरम्यान, ही दरवाढ केवळ उच्च दर्जाच्या प्रीमियम पेट्रोलपुरतीच मर्यादित आहे. जर तुम्ही तुमच्या रोजच्या प्रवासासाठी वाहनात रेग्युलर (सामान्य) पेट्रोल भरत असाल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, रेग्युलर पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
औद्योगिक डिझेलच्या दरात २२ रुपयांनी वाढ
दरम्यान, एलपीजी संकटानंतर आता पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) आता औद्योगिक डिझेलच्या दरात प्रतिलिटर २२ रुपये इतकी लक्षणीय वाढ केली आहे. त्याचा औद्योगिक क्षेत्राला फटका बसला आहे. उत्पादन, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा येथे डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्याना या दरवाढीचा फटका बसणार आहे. या दरवाढीचा परिणाम दैनंदिन वापराच्या वस्तूंवरही होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दोन रुपयांपेक्षा जास्त वाढ
तेल विपणन कंपन्यांनी २० मार्च २०२६ पासून प्रीमियम पेट्रोलच्या दरात मोठी वाढ केली आहे. तेल कंपन्यांच्या रिपोर्टनुसार, ही दरवाढ प्रति लिटर २ रुपयांपासून २.३० रुपयांपर्यंत असणार आहे. त्यानुसार, बीपीसीएलच्या स्पीड, एचपीसीएलच्या पॉवर आणि आयओसीएलच्या एक्सपी ९५च्या दरात प्रति लिटर २.०९ ते २.३५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये प्रीमियम पेट्रोलच्या दरात दोन रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली असून, आता पेट्रोलचा दर १०३.९२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर, पुण्यात प्रीमियम पेट्रोलचा दर प्रति लिटर ११३.७७ रुपयांपर्यंत वाढला आहे.