मालदीवच्या अध्यक्षांविरुद्ध महाभियोगाची तयारी; भारतविरोधी भूमिकेमुळे विरोधी पक्ष नाराज

मुईझू यांच्या भारतविरोधी धोरणांमुळे मालदीवमधील विरोधी पक्ष नाराज झाले असून त्यांनी अध्यक्षांना पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मालदीवच्या अध्यक्षांविरुद्ध महाभियोगाची तयारी; भारतविरोधी भूमिकेमुळे विरोधी पक्ष नाराज
Published on

माले : मालदीवचे चीनधार्जिणे अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची तयारी तेथील विरोधी पक्षांनी केली आहे. मुईझू यांच्या भारतविरोधी धोरणांमुळे मालदीवमधील विरोधी पक्ष नाराज झाले असून त्यांनी अध्यक्षांना पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मालदीवमध्ये सध्या अध्यक्ष मुईझू यांची पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) आणि प्रोग्रेसिव्ह पार्टी यांचे आघाडी सरकार सत्तेत आहे. मुईझू यांनी निवडणूक जाहीरनाम्यातच भारतविरोधाचे धोरण अवलंबले होते. निवडून आल्यास भारताला मालदीवमधील सैन्य मागे घेण्यास भाग पाडू, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले होते. त्यानुसार अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी भारताला सैन्य मागे घेण्याची मागणी केली. भारताबरोबरचा जलविज्ञान करार रद्द केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. त्यावरून दोन्ही देशांत वाद निर्माण झाला. मालदीवच्या मंत्र्यांनी मोदीविरोधी विधाने केली. त्यामुळे तेथील तीन मंत्र्यांची हकालपट्टी झाली. भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला.

या सर्व घटनाक्रमामुळे अध्यक्ष मुईझू यांच्या सरकारने तेथील विरोधी पक्षांचा रोष ओढवून घेतला. भारतासारख्या विश्वासू मित्राला नाराज केल्याबद्दल मुईझू यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तेथील महत्त्वाचा विरोधी पक्ष असलेल्या मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीने (एमडीपी) केली. तसेच मुईझू यांच्या सरकारविरुद्ध संसदेत अविश्वाचा ठराव आणला. रविवारी या ठरावावर मतदान होणार होते. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये हाणामारी झाली. संसदेत खासदार एकमेकांना लाथाबुक्क्या मारत असलेली दृश्ये सोशल मीडियावरून व्हायरल झाली. त्यानंतर विरोधी पक्षांनी मुईझू यांच्याविरुद्ध महाभियोग चालवून त्यांना हटवण्याची तयारी केली आहे.

संसदेत कडेकोट सुरक्षा

मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीने (एमडीपी) देशाचे अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग चालवण्याची तयारी केली आहे. त्यांनी अनेक खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन तयार केले आहे. रविवारी मुईझू सरकारविरुद्ध अविश्वास ठरावादरम्यान संसदेत खासदारांची हाणामारी झाली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरात पोलीस आणि सेनादलांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. राजधानी माले शहरात तणावाचे वातावरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in