आणीबाणी हा काळाकुट्ट अध्याय! राष्ट्रपतींच्या अभिभाषणात राज्यघटनेवरील हल्ल्यावर भर; आयुष्मान भारत, पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख

देशावर १९७५ मध्ये आणीबाणी लादण्यात आली, तो राज्यघटनेवरील थेट हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळाकुट्ट अध्याय होता, मात्र देशाने अशा प्रकारच्या घटनाबाह्य शक्तींवर विजय मिळविला, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सदनांसमोर केलेल्या अभिभाषणात स्पष्ट केले.
आणीबाणी हा काळाकुट्ट अध्याय! राष्ट्रपतींच्या अभिभाषणात राज्यघटनेवरील हल्ल्यावर भर;
आयुष्मान भारत, पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख

नवी दिल्ली : देशावर १९७५ मध्ये आणीबाणी लादण्यात आली, तो राज्यघटनेवरील थेट हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळाकुट्ट अध्याय होता, मात्र देशाने अशा प्रकारच्या घटनाबाह्य शक्तींवर विजय मिळविला, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सदनांसमोर केलेल्या अभिभाषणात स्पष्ट केले.

राज्यघटनेचा मसुदा तयार केला जात होता तेव्हा भारत असमर्थ ठरेल, अशी जगातील काही शक्तींची इच्छा होती. इतकेच नव्हे, तर राज्यघटना अंमलात आल्यावरही घटनेवर अनेक हल्ले करण्यात आले, असेही मुर्मू म्हणाल्या.

आज २७ जून आहे, देशावर २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लादण्यात आली, तो घटनेवरील थेट हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळाकुट्ट अध्याय होता. संपूर्ण देश आक्रोश करीत होता, तरीही देशाने अशा प्रकारच्या घटनाबाह्य शक्तींवर विजय प्राप्त केला. कारण प्रजासत्ताकाची परंपरा भारताच्या केंद्रस्थानी आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

घटना ही देशाचा कारभार चालविण्याचे माध्यम आहे, असे आपल्या सरकारला वाटत नाही, तर आपली घटना ही सार्वजनिक विवेकाचा एक भाग असण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत, हीच बाब ध्यानात घेऊन आपले सरकार २६ नोव्हेंबर रोजी घटनादिन साजरा करते. आता जम्मू-काश्मीरमध्येही घटना अंमलात आली आहे. तेथे अनुच्छेद ३७० मुळे स्थिती वेगळी होती, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सैन्यातील सुधारणेबाबत व वादग्रस्त ठरलेल्या अग्निवीर योजनेबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आला नाही.

आयुष्मान भारत योजनेचा वृद्धांना लाभ

दरम्यान, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेखाली देशातील ७० वर्षांवरील सर्व नागरिकांना विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देशात २५ हजार जन औषधी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेद्वारे ५५ कोटी लाभार्थ्यांना विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईचे संकेत

राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणामध्ये पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख केला. या घटनेची सखोल चौकशी करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुर्मू म्हणाल्या. पक्षीय राजकारणातून बाहेर येऊन देशव्यापी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नव्या सदस्यांचे अभिनंदन

मुर्मू यांनी १८ व्या लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचे आणि निवडणुका योग्य प्रकारे पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले. काश्मीरमध्ये विक्रमी मतदान झाले. त्यामुळे देशाच्या शत्रूंना चोख उत्तर मिळाले आहे. जागतिक स्तरावर सेंद्रीय उत्पादनांची वाढती मागणी असून देशातील शेतकरी ती पूर्ण करण्यास सक्षम आहेत. ईशान्येत शांतता प्रस्थापित करून विकासाचे प्रयत्न केले जात आहेत, आदी मुद्द्यांनाही मुर्मू यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला आणि जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सलग तिसऱ्यांदा स्पष्ट कौल दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

आणीबाणीच्या उल्लेखाबाबत राहुल गांधी यांची नाराजी

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या पहिल्याच भाषणात आणीबाणीचा उल्लेख करून त्याबाबत निषेध व्यक्त करणारा ठराव केल्याबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी बिर्ला यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. गांधी यांनी बिर्ला यांची भेट घेतली आणि आणीबाणीबाबतचा उल्लेख हा पूर्णपणे राजकीय हेतूने करण्यात आला होता आणि तो उल्लेख टाळता येऊ शकला असता, असे स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली. बिर्ला यांनी सभागृहात आणीबाणीचा उल्लेख केल्याचा प्रश्न गांधी यांनी तेव्हा उपस्थित केला, असे काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी वार्ताहरांना सांगितले. ही सदिच्छा भेट होती. राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्यात आल्याचे बिर्ला यांनी घोषित केल्यामुळे गांधी यांनी इंडिया आघाडीतील अन्य नेत्यांसमवेत बिर्ला यांची भेट घेतली, असे वेणुगोपाळ म्हणाले.सभागृहात आणीबाणीचा उल्लेख करण्यात आला, तो प्रश्न बिर्ला यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आला का, असे विचारले असता वेणुगोपाळ म्हणाले की, संसदेच्या कामकाजासह अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आणि आणीबाणीचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. आणीबाणीचा उल्लेख टाळता आला असता, असे गांधी यांनी बिर्ला यांना सांगितले, असे वेणुगोपाळ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in