

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास केला. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी फेब्रुवारी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ‘आयएनएस सिंधू रक्षक’ पाणबुडीतून प्रवास केला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सशस्त्र दलांच्या सर्वोच्च सेनापती असलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित होते. नौदलाच्या कारवार येथील तळावरून हा प्रवास करण्यात आला.
नौदलाचा गणवेश परिधान केलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांनी पाणबुडीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी नौदल कर्मचाऱ्यांना अभिवादन केले. त्यांनी ‘आयएनएस वाघशीर’च्या चालक दलाशी संवाद साधला आणि त्यांच्या समर्पणाचे कौतुक केले. स्वदेशी पाणबुडी ही भारतीय नौदलाच्या व्यावसायिक उत्कृष्टतेचे आणि लढाऊ सज्जतेचे उज्ज्वल उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपतींना भारताच्या सागरी रणनीतीत पाणबुडी दलाची भूमिका, त्यांची कार्यक्षमता तसेच राष्ट्रीय सागरी हितसंबंधांच्या संरक्षणातील योगदान याबाबत माहिती देण्यात आली.
शक्तिशाली पाणबुडी
‘आयएनएस वाघशीर’ ही पी-७५ स्कॉर्पिन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी असून, जानेवारीमध्ये ती नौदलात दाखल झाली. नौदल अधिकाऱ्यांच्या मते, ही जगातील बहुपयोगी डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांपैकी एक आहे. ही पाणबुडी पृष्ठभागावरील युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती संकलन, क्षेत्रीय देखरेख आणि विशेष मोहिमा अशा विविध कार्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार प्रणालींनी सुसज्ज असलेल्या या पाणबुडीमध्ये मॉड्युलर बांधकाम पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. भविष्यात ‘एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन’ (एआयपी) तंत्रज्ञानाच्या समावेशासारख्या सुधारणा करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे.