भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावर दबाव -केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे.
भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावर दबाव -केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. भाजपमध्ये गेले की सगळे खून माफ होतात, आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे काहीही झाले तरीही झुकणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले.

केजरीवाल म्हणाले की, “केंद्र सरकार त्यांच्या इच्छेनुसार आमच्याविरुद्ध कट करू शकतात, काहीही होणार नाही. मीही त्यांच्याविरोधात ठाम आहे. मीही सोडणार नाही. ते म्हणतात भाजपमध्ये या, आम्ही सोडू. मी म्हणालो, मी अजिबात येणार नाही. भाजपमध्ये का जावे? भाजपमध्ये गेल्यास सर्व खून माफ होतील. आम्ही शाळा, रुग्णालये बांधत आहोत, रस्ते बांधत आहोत, पाण्याची व्यवस्था करत आहोत, गटारांची दुरुस्ती करत आहोत. आम्ही काय चुकीचे केले आहे? असा सवालही केजरीवाल यांनी विचारला.

आतिशी यांनाही दिल्ली पोलिसांची नोटीस

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम आणि शिक्षण मंत्री आतिशी मार्लेना यांच्या निवासस्थानी धडक दिली. यावेळी आतिशी घरात नव्हत्या. त्यामुळे पोलीस पथकाने काही वेळ आतिशी यांच्या घराबाहेर त्यांची वाट पाहिली आणि परत गेले. आतिशी मार्लेना दुपारी घरी परतल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुन्हा एकदा मार्लेना यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी आतिशी मार्लेना यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे नोटीस सोपवली आणि माघारी परतले.

logo
marathi.freepressjournal.in