केसरचा दर गगनाला! १ किलोच्या किंमतीत येईल ७० ग्रॅम सोने; खाद्यपदार्थ,सौंदर्य प्रसाधनेही महागणार

सोन्याचे दर रोज वाढत आहेत. त्याचबरोबर एका मसाल्याच्या पदार्थाची किंमत गगनाला भिडली आहे. ते म्हणजे केसर.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)ANI

नवी दिल्ली : सोन्याचे दर रोज वाढत आहेत. त्याचबरोबर एका मसाल्याच्या पदार्थाची किंमत गगनाला भिडली आहे. ते म्हणजे केसर. या केसराचा दर किलोला ४.९५ लाख रुपये झाला आहे. या रक्कमेत तुम्ही ७० ग्रॅम सोने खरेदी करू शकता.

जम्मू-काश्मीरात केसरचे मोठे उत्पादन होत असते. सध्या जागतिक बाजारात केसरची आवक घटली आहे. कारण पश्चिम आशियातील इराणमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती आहे. केसरच्या उत्पादनात इराणचा मोठा वाटा आहे. इराणनंतर भारतातील जम्मू-काश्मीरात केसराचे उत्पादन होते. पण, केसराची मागणी वाढल्याने भारतात केसर आयात करावी लागते. वाढलेली मागणी व इराणकडून कमी झालेल्या पुरवठयामुळे केसराचे दर किलोला ४.९५ लाख रुपये झाले आहेत. याचाच फायदा आता भारतीय केसर उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना होत आहे. भारतीय केसरच्या दरात गेल्या महिन्यात घाऊक बाजारात २० टक्के तर किरकोळ दुकानात २७ टक्के वाढ झाली. भारतातील चांगल्या दर्जाची केसरही घाऊक बाजारात ३.५ लाख रुपये प्रति किलो विकली जात आहे. पण, प. आशियातील संघर्ष पेटल्यापूर्वी केसरचा दर प्रति किलो २.८ ते ३ लाख रुपये होता. आता याचाच दर किरकोळ बाजारात ४.९५ लाख रुपये किलोवर पोहोचला आहे.

इराणमध्ये ४३० टन केसराचे उत्पादन होते. जागतिक केसर उत्पादनात हा वाटा ९० टक्के आहे. केसरमुळे गोड पदार्थांना चव येते. तसेच सौंदर्य प्रसाधने व औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. केसर महागल्याने खाद्य पदार्थ व औषधे महाग होऊ शकतात, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

जम्मू-काश्मिरच्या अनेक भागात केसरचे उत्पादन घटले आहे. कारण या भागात सिमेंटच्या फॅक्टरी वाढल्या आहेत. त्याचा परिणाम केसरवर झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in