राज्याचा सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार,पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

सदिच्छा दौऱ्याची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळपास दीड तास झालेल्या दीर्घ चर्चेने झाली
 राज्याचा सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार,पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीच्या ‘सदिच्छा’ दौऱ्याची सांगता अखेर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळपास दीड तास झालेल्या दीर्घ चर्चेने झाली. “हे सरकार सर्वसामान्यांचे असल्याने राज्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, यावर चर्चा झाली. शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि राज्याच्या विकासासाठी जे सहकार्य लागेल, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाईल,” असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले एकनाथ शिंदे म्हणाले की, “पंतप्रधानांनी आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या देशाचा गौरव त्यांनी सातासमुद्रापार नेला आहे. त्यामुळे त्यांना भेटून मला आनंद झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्ही भरभरून चर्चा केली. एवढ्या मोठ्या पदावर असतानाही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढा वेळ देणे, हे मी माझे भाग्य समजतो.”

शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यावर शनिवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही सदिच्छा भेट घेतली.

ओबीसी आरक्षणावर नव्या सरकारची भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, “ओबीसी आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. यासंदर्भात महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळावा, हीच आमची आधीपासूनची भूमिका होती आणि आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, हीच आमची इच्छा आहे.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in