२०२४ ला हॅट‌ट्रिकची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

तीन राज्यांत भाजपला मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. ‘सर्वांना साथ, सर्वांचा विकास’ याचा विजय झाला आहे.
२०२४ ला हॅट‌ट्रिकची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये मिळालेल्या विजयामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत हॅटट्रिकची गॅरंटी मिळाली आहे, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

तीन राज्यांतील विजयानंतर भाजप मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. महिलांचा विकास हा भाजपच्या विकास मॉडेलचा मुख्य आधार आहे. या निवडणुकीत महिला, बहिणी व मुलींनी भाजपला मोठा आशीर्वाद दिला. भाजपने जी आश्वासने दिली आहेत, ती शंभर टक्के पूर्ण केली जातील, ही मोदींची गॅरंटी आहे, असे मी विनम्रपणे देशातील प्रत्येक बहीण व मुलीला सांगू इच्छितो.

‘‘भाजपच्या सेवेला कोणताही पर्याय नाही, हे आम्हाला मध्य प्रदेशने दाखवून दिले आहे. छत्तीसगडच्या पहिल्याच सभेत मी सांगितले होते की, मी तुमच्याकडे काहीही मागायला आलो नाही, तर शपथ समारंभाचे निमंत्रण तुम्हाला द्यायला आलो आहे,’’ असे मोदी म्हणाले.

या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद संपूर्ण जगात जातील. काही घराणेशाहीचे लोक एकाच व्यासपीठावर आल्यानंतर चांगला फोटो निघू शकतो. मात्र, देशाचा विश्वास जिंकला जाऊ शकत नाही. देशाच्या जनतेचे मन जिंकण्यासाठी राष्ट्रसेवेची आवड असायला हवी. घमंडिया आघाडीत ती किंचितही दिसून येत नाही, अशी टीका त्यांनी केली.

प्रगती व जनकल्याणाच्या राजकारणाविरोधात उभे राहणाऱ्यांना आजच्या निकालाने मोठा इशारा दिला आहे. जेव्हा विकास होतो, तेव्हा काँग्रेस व त्यांचे साथीदार विरोध करतात. तुम्ही सुधरा अन्यथा जनता तुमचे नामोनिशाण मिटवेल, असा इशारा देशातील गरीबांनी दिला आहे, असे मोदी यांनी सांगितले.

जगाच्या मंदीचा परिणाम भारतावर पडेल, असे काही जण सांगत होते. मात्र, भारताने चांगली कामगिरी केली आहे. भारत आज जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे, असे मोदी म्हणाले.

तीन राज्यांत भाजपला मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. ‘सर्वांना साथ, सर्वांचा विकास’ याचा विजय झाला आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शी व सुशासन यांचा विजय झाला आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीत देशाला जातींमध्ये वाटण्याचे प्रयत्न झाले. मात्र, देशात केवळ चारच जाती आहेत. त्या म्हणजे महिला, तरुण, शेतकरी व गरीब. या चार जाती सशक्त झाल्याने देश मजबूत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in